प्रवीण पोटे पाटील यांची दावेदारी पक्की

भाजपची उमेदवारी मिळाल्यास पोटे पाटील विजयाची हॅट्टीक साधणार?

राणा दांपत्याचे समर्थक डॉ. नितीन धांडे यांचीही मोर्चेबांधणी

अमरावती /18 मे महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीचा बिगुल वाजला असून, भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री प्रविण पोटे पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचे खात्रीशिर वृत्त आहे. सलग दोनदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले पोटे पाटील यंदा विजयाची हॅट्ट्रीक साधण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात असून, येत्या 28 मे पर्यंत भाजपच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राणा दांपत्याने भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या नावासाठी आग्रह धरल्याने या जागेवरील राजकीय चुरस अधिकच वाढली आहे. मागील निवडणुकीत प्रविण पोटे पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवून मतदारसंघावरील आपली राजकीय पकड मजबूत केली होती. त्यानंतर त्यांना राज्य मंत्रिमंडळातही स्थान मिळाले होते. आता पक्षाकडून त्यांना सलग तिसर्‍यांदा संधी मिळण्याचे संकेत असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षाच्या अंतिम निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनीही आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीवर दावा ठोकला आहे. डॉ. धांडे यांनी महानगरपालिका सदस्यांसह जिल्ह्यातील विविध नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष व सदस्यांच्या भेटीगाठी घेण्याचा धडाका लावला आहे. मात्र, महायुतीमधील इतर घटक पक्षांकडून डॉ. धांडे यांच्या उमेदवारीला अद्याप कोणताही विशेष पाठिंबा मिळालेला नाही. केवळ राणा दांपत्य त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पक्षाचा निर्णय आपल्याला अंतिम राहील आणि उमेदवारी कोणालाही मिळाली तरी बंडखोरी न करता एकत्र काम करू, अशी जाहीर भूमिका पोटे पाटील आणि डॉ. धांडे या दोन्ही नेत्यांनी आधीच स्पष्ट केली आहे. त्यामुळे तूर्तास तरी पोटे पाटील यांचे पारडे जड मानले जात आहे.
पक्षादेश शिरसावंद्य मानून बंडखोरी टाळणार-उमेदवारी कोणालाही मिळो, पक्षाचा निर्णय अंतिम मानून बंडखोरी न करता संघटितपणे काम करण्याचा निर्धार दोन्ही प्रमुख दावेदारांनी व्यक्त केला आहे. यामुळे भाजपमधील संभाव्य अंतर्गत कलह टळल्याचे स्पष्ट दिसत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button