अजितदादांचा घातपात असेल तर दोषींचा मुडदाही खणून काढू

मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत ग्वाही

मुंबई/25 मार्च – अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं. आकाश-पाताळ एक करू, पण या प्रकरणात कोणाचा घातपात झाला असेल तर, त्यात कुणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन करणार नाही, असं ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं. अजित पवार यांचं बारामतीत विमान दुर्घटनेत अपघाती निधन झालं. या घटनेनंतर अजित पवार यांचा घातपात झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केला. या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एफआयआर नोंदवण्यासाठी प्रयत्न केले. कर्नाटकात जाऊन त्यांनी तिथं अजित पवार अपघात प्रकरणी झिरो एफआयआर नोंदवला. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज, बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या अपघातावर निवेदन केलं. पाच वर्षांत सर्वात जास्त मैत्री दादांसोबत होती, असं फडणवीस म्हणाले. अजित पवारांच्या घातपाताची शंका व्यक्त केली जात आहे. त्यावरही फडणवीस यांनी थेट भाष्य केलं. मी तुम्हाला आश्वासन देतो. तुमच्या कुणाच्याही मनात शंका ठेवू नका. आकाश-पाताळ एक करून यात जर कोणाचा घातपात असेल तर, कोणाचाही बाप असेल तर त्याला खोदून काढू, असं ठाम आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिलं. आम्ही अजिबात सहन करणार नाही. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते. पण इतकी बोथट नाही. अजितदादांच्या प्रकरणात कोणी कट रचला असेल तर त्याचा मुडदाही खणून काढू, असंही फडणवीस म्हणाले. यावेळी रोहित पवार यांच्या प्रयत्नांना माझं समर्थन आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button