महापौर श्रीचंद तेजवानी यांनी सांभाळली ‘गेस्ट एडिटर’ची धुरा
कधी विचार केला नव्हता, मी संपादक होईल...

* वर्तमान पत्राचे काम कसे चालते हे आज अगदी जवळून बघायला मिळाले
* मंडल मीडिया हाउसचे पहिले गेस्ट एडिटर अमरावतीचे महापौर
* एक दिवसाचे संपादक श्रीचंद तेजवानी यांनी स्विकृत
* नगरसेवक अनिल अग्रवाल यांची मनोहारी मुलाखत घेतली
अमरावती / 19 मार्च – विदर्भातील प्रमुख हिंदी दैनिक ’अमरावती मंडल’, लोकप्रिय मराठी दैनिक ’आपली मातृभूमी’ आणि ’मंडल न्यूज’चे संचालन करणार्या ’मंडल मीडिया हाऊस’ने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना संपादकाच्या जबाबदार्या आणि माध्यमांच्या कार्यप्रणालीची प्रत्यक्ष ओळख करून देण्याच्या उद्देशाने ’गेस्ट एडिटर’ ही नवीन संकल्पना मांडण्यात आली आहे. मंडल मीडिया हाऊसचे पहिले ’गेस्ट एडिटर’ होण्याचा मान अमरावती शहराचे प्रथम नागरिक आणि महापौर श्रीचंद तेजवानी यांना मिळाला.गुरुवारी दुपारी 2 वाजता महापौर तेजवानी आणि महानगरपालिकेचे सभागृह नेते चेतन गावंडे यांचे मंडल मीडिया हाऊसच्या कार्यालयात आगमन झाले. मीडिया हाऊसचे मुख्य संपादक अनिल अग्रवाल यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन महापौरांचे भावपूर्ण स्वागत केले. याप्रसंगी माजी महापौर चेतन गावंडे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान अनिल अग्रवाल यांनी महापौरांना संपादकाला प्रत्यक्षात कोणत्या जबाबदार्या पार पाडाव्या लागतात, याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर, महापौर तेजवानी यांना सन्मानाने संपादकाच्या खुर्चीवर बसवण्यात आले. पदभार स्वीकारताच त्यांनी उपसंपादक सी.पी. दुबे यांच्याकडून वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार्या बातम्या आणि मुख्य मजकुराचा आढावा घेतला.
संपादकीय प्रक्रिया समजून घेतल्यानंतर, संपादक श्री.अनिल अग्रवाल यांनी त्यांची टीममधील इतर सहकार्यांशी ओळख करून दिली. गेस्ट एडिटर श्रीचंद तेजवानी यांनी पेजिंग, डिझाइनिंग, न्यूज इनपुट, न्यूज एजन्सी, जाहिरात आणि वितरण यांसारख्या सर्व तांत्रिक पैलूंवर सविस्तर चर्चा केली आणि आपले विचार मांडले. यावेळी व्यवस्थापकीय संपादक श्री. राजेश अग्रवाल यांनी महापौरांना मंडल मीडिया हाऊसच्या आतापर्यंतच्या विकास प्रवासाची माहिती दिली.संपादकीय विभागाचे श्री. लक्ष्मीकांत खंडेलवाल, संजय पंड्या यांनी वृत्तपत्राचे दैनंदीन कामकाजाची ओळख करुन दिली.
अमरावती मंडल संपादकीय मंडळाशी बोलल्यानंतर गेस्ट एडिटर तेजवानी यांनी ’मंडल न्यूज’च्या स्टुडिओला भेट दिली. मंडल न्यूजच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांना प्रचंड उत्सुकता होती. याच स्टुडिओमधून महानगर पालिकेच्या निकालाचे विश्लेषण करणारा अभूतपूर्व व लाखो प्रेक्षक लाभलेला लाईव्ह कार्यक्रम प्रसारित झाला होता. मंडल न्यूज समाजातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती येथेच रेकॉर्ड करतो. अनेक पॉडकास्ट झालेल्या सेटवर आल्यानंतर महापौरांनी खूप आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, मी आज मुलाखत घेणार आणि खरोखरच त्यांनी मंडल मीडिया हाऊसचे मुख्य संपादक अनिल अग्रवाल यांची दिलखुलास मुलाखत घेतली. प्रारंभीच गेस्ट एडिटर तेजवानी म्हणाले, आज मी महापालिकेचे स्वीकृत सदस्य अनिल अग्रवाल यांची मुलाखत घेत आहे. एकदिवसीय संपादकाने 35 वर्षांचा दीर्घ अनुभव असलेल्या संपादकाची मात्र स्विकृत नगरसेवक या भूमिकेची वेगवेगळ्या मुद्यांवर अतिशय चमकदार अशी मुलाखत घेतली.
मुलाखत संपल्यानंतर गेस्ट एडिटर श्रीचंद तेजवानी संपादकाच्या खुर्चीत जाऊन बसले आणि ज्येष्ठ संपादकाच्या भूमिकेत येऊन त्यांनी थेट पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याशी संपर्क साधला. शहरातील शांतता व सुव्यवस्था यासोबतच अनेक विषयांवर त्यांनी पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारले. आयपीएस राकेश ओला यांच्यासाठी हा अनुभव अत्यंत आनंददायी होता. त्यांनीही प्रतिसाद देताना आपण एका ज्येष्ठ संपादकाशी बोलत आहोत ही भूमिका स्वीकारली. पोलीस आयुक्तांसोबत झालेला हा संवाद अतिशय सहज होता, मात्र तेवढाच तो प्रशासकीय शैलीचाही उत्तम नमुना होता.
महापौर स्वतः अमरावती महापालिकेच्या सर्वोच्च स्थानी असले तरी आज मात्र त्यांनी संपादकाची भूमिका स्वीकारली होती. संपादक म्हणून त्यांनी महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांना फोन केला. श्रीमती सौम्या शर्मा आश्चर्यात पडल्या. महापौर सर संपादक झाले हे ऐकून त्यांनी खूप उत्साही प्रतिसाद दिला. गेस्ट एडिटर तेजवानी अगदी मुरलेल्या संपादकासारखे प्रश्न विचारत होते आणि त्याला तेवढ्याच चपखलपणे आयुक्त उत्तर देत होत्या. क्षणभर वाटणारी ही जुगलबंदी अत्यंत मनोहारी ठरली.




