‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत 32 शेतकर्‍यांचा राज्यस्तरीय अभ्यास दौरा

अमरावती /20 मार्च : महाराष्ट्र अँग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा व प्रक्षेत्र भेटी दि. 16 ते 18 मार्च कालावधीत पार पडल्या. प्रकल्पाच्या ’बाजार विकास व प्रोत्साहन’ घटकांतर्गत दौर्‍यात 32 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.
या दौर्‍यात शेतकर्‍यांना शेतमाल प्रक्रिया, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि जागतिक बाजारपेठेतील संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकर्‍यांनी चिखली येथील ’आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनी’ला भेट दिली. येथे भाजीपाला व फळे प्रक्रिया उद्योग, निर्यातीच्या संधी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल प्रत्यक्ष माहिती घेतली. त्यानंतर बदनापूर, जालना येथील मोसंबी संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन फळबाग व्यवस्थापना विषयी माहिती घेतली. सिन्नर येथील कृषक मित्र ग्रो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड येथे भेट देऊन परदेशातील निर्यात संधींची माहिती घेतली. त्यानंतर सह्याद्री फार्म्सला भेट देऊन शेतकरी बळकटीकरण, मूल्यवर्धन आणि मोठ्या प्रमाणावरील निर्यात साखळीचे प्रात्यक्षिक पाहिले. तसेच जैन हिल्स, जळगाव येथील टिश्यू कल्चर कंपनीला भेट देऊन केळीच्या महिला बळकटीकरण, नवीन जाती आणि दर्जेदार रोपांविषयी माहिती घेतली. जैन इरिगेशनमधील आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि संशोधन कार्याची माहिती घेऊन जैन फूड पार्कमधील प्रक्रिया केंद्राला भेट दिली.दौर्‍यामुळे शेतकर्‍यांना शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि थेट बाजारपेठेशी जोडले गेल्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास प्रकल्प उपसंचालक अरुण नादरे यांनी व्यक्त केला. सदर अभ्यास दौरा प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. दौर्‍यासाठी कृषि व्यवसाय तज्ज्ञ अक्षय गणेशपुरे आणि विद्या पुंड यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

संबंधित बातम्या

Back to top button