उड्डाण 2026 स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती /18 मार्च : समाजहिताचे ध्येय उराशी बाळगून अभियंत्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या उडान इंजिनिअर्स मल्टिपर्पज सोसायटीचा ’उडान 2026’ हा स्नेहसंमेलन सोहळा अमरावतीत मोठ्या उत्साहात पार पडला. शिक्षणासाठी आर्थिक मदत, रोजगाराच्या संधी आणि उद्योजकता विकासाच्या माध्यमातून तरुणांना बळ देणार्या या संस्थेच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात ऐतिहासिक नाट्यप्रयोग, पदवीधर तरुणांचा सत्कार आणि नवीन संकेतस्थळाचे लोकार्पण अशा विविधांगी उपक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कठोरा नाका परिसरातील रंगोली लॉन्स येथे आयोजित या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नितीन देशमुख होते. संस्थेचे अध्यक्ष अभियंता निलेश चौधरी यांनी प्रास्ताविकातून उडानच्या आजवरच्या यशस्वी प्रवासाचा आलेख मांडला. मुख्य पाहुणे संतोष काकडे यांनी आपल्या भाषणात अभियंत्यांच्या या सामाजिक चळवळीचे कौतुक करत हा सेवायज्ञ असाच अविरत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महादजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक नाट्यकृती. पानिपतच्या रणधुमाळीचा थरार अनुभवताना उपस्थित प्रेक्षक भारावून गेले होते. याप्रसंगी अभियंता पीयूष हांडे यांनी तयार केलेल्या www.uddan.org.in या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले, ज्यावर संस्थेच्या सर्व कामांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. केवळ उत्सव न साजरा करता सामाजिक जाणीव ठेवून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी शिष्यवृत्ती देऊन मदतीचा हात देण्यात आला. तसेच विविध मोठ्या कंपन्यांमध्ये मानाची पदे मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर आधारित चर्चासत्राने तरुणांना नवी दिशा दिली. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी अभियंता गौरव मोहोड, अक्षय महल्ले, मोहिनी धोंडे, अश्विन पवार, तुषार देशमुख, शिवराज काळणे, तुषार थोटे, अभिजीत देशमुख, राजू ठेंग, मनोज साबळे, मोहिनी देशमुख आणि वैदेही वरघट यांनी मोलाचे योगदान दिले. प्रवीण भोसले व तनुश्री कडू यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने सोहळ्याची रंगत अधिकच वाढली.




