इस्कॉनद्वारे श्री श्री गौर पौर्णिमा महामहोत्सव उत्साहात
रशियन भक्तांची विशेष उपस्थिती

* हरिनाम संकीर्तनाने परिसर दुमदुमला
अमरावती /4 मार्च : जागतिक कीर्तीचे कीर्तन सम्राट आणि इस्कॉन पदयात्रा मंत्रालयाचे प्रमुख परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या पावन प्रेरणेने, अमरावतीतील सरस्वती कॉलनीतील इस्कॉन मंदिरात ’श्री गौर पूर्णिमा महामहोत्सव’ अत्यंत उत्साहात साजरा झाला.
यंदाच्या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे रशियातून आलेल्या कृष्णभक्तांनी विदर्भाच्या भूमीत हरिनामाचा जयघोष करत उपस्थितांची मने जिंकली. पहाटेच्या मंगल आरतीपासून ते रात्रीच्या महाप्रसादापर्यंत संपूर्ण वातावरण चैतन्यमयी झाले होते. चंद्रग्रहणामुळे दिवसभर मंदिराचे पट बंद असूनही भक्तांच्या उत्साहात तसूभरही कमतरता नव्हती, उलट अखंड नामसंकीर्तनाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. महोत्सवाची सुरुवात 3 मार्च 2026 रोजी पहाटे 4:30 वाजता श्री श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांच्या मंगलमयी आरतीने झाली. त्यानंतर भाविकांनी एकत्रितपणे ’हरे कृष्ण’ महामंत्राचा जप केला. सकाळी 7:30 वाजता इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांची गुरुपूजा करण्यात आली. दिवसभर ग्रहण काळ असल्याने भाविकांनी भक्तीभावाने अखंड हरिनाम संकीर्तन केले. संध्याकाळी 7:30 वाजता ग्रहण सुटल्यानंतर श्री श्री गौर निताईंचा अतिशय विलोभनीय असा महाअभिषेक करण्यात आला. या मंगल विधीमध्ये श्रीमान पद्मनाभ प्रभूजी, अद्वैत आचार्य प्रभूजी, रणछोड कृष्ण प्रभूजी, सचिप्राण प्रभूजी, राम अवतार प्रभूजी, श्री विठ्ठल प्रभूजी, सुंदरनाथ प्रभूजी, श्री गोविंद प्रभूजी, नित्य हरिनाम प्रभूजी, अवतारी गोविंद प्रभूजी आणि आचार्य चंद्र प्रभूजी यांसारख्या ज्येष्ठ भक्तांनी सहभाग घेतला.या सोहळ्यात रशियन भक्तांनी सादर केलेल्या नृत्याने आणि गायनाने अमरावतीकर भक्तांना मंत्रमुग्ध केले.




