खेळण्यातील नोटांनी लाचखोर जाळयात
रस्ते बिलासाठी आणि अनुदानासाठी वसुली, दर्यापूर व चांदूर बाजारात कारवाई

* एसीबीचा सर्जिकल स्ट्राईक
दर्यापूर/25 फेब्रुवार : जिल्ह्यात भ्रष्टाचार करणार्या पांढरपेशा गुन्हेगारांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आक्रमक पवित्रा घेत दर्यापूर आणि चांदूरबाजारमध्ये दोन मोठे ’सर्जिकल स्ट्राईक’ केले आहेत. शासकीय कामाचे थकीत बिल आणि अनुदानाची रक्कम खात्यात जमा करून देण्याच्या बदल्यात लाचेची ’मागणी’ करणार्या चार लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दर्यापूर तालुक्यातील कान्होली येथे चक्क खेळण्यातील बनावट नोटांचा वापर करून एसीबीने सापळा रचला आणि 30 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी गोपाल देविदास चारथळ, ग्रामपंचायत सदस्य पदमाकर साहेबराव राउत आणि मध्यस्थ मोतीराम गोंडूजी कोल्हे या तिघांना रंगेहात बेड्या ठोकल्या. दुसरीकडे चांदूरबाजार मध्ये वडिलांच्या खात्यात जमा झालेल्या अनुदानावर डल्ला मारणारा कृषी सहायक सतीश श्रीकृष्ण निमकर हा देखील एक हजार रुपयांची लाच घेताना भरबाजारात जाळ्यात अडकला. या धडक कारवाईने जिल्ह्यातील भ्रष्ट यंत्रणेचे धाबे दणाणले असून सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.
कान्होली येथील सिमेंट रस्त्याचे 4 लाख 20 हजार रुपयांचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी लाचखोरांनी 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. वारंवार होणार्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. अमरावती एसीबीच्या पथकाने 18 आणि 23 फेब्रुवारी रोजी पडताळणी केली असता लाचेची मागणी सिद्ध झाली आणि तडजोडीनंतर 30 हजार रुपयांचा आकडा ठरला. बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दर्यापूर येथील लक्ष्मी झेरॉक्स केंद्राजवळ दबा धरून बसलेल्या पथकाने झडप घालून आरोपींना ताब्यात घेतले. तिकडे चांदूरबाजार येथे सतीश निमकर याने 17 हजार 952 रुपयांच्या अनुदानासाठी चहा-पाण्याच्या नावाखाली एक हजार रुपयांची मागणी केली होती. गुरुवारी दुपारी 2 वाजून 21 मिनिटांच्या सुमारास तालुका कृषी कार्यालयासमोर लाचेची रक्कम स्वीकारताच त्यालाही जेरबंद करण्यात आले. या दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, सुनील लांजेवार, सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, योगिता ठाकरे, मंगेश मोहोड, ज्ञानोबा फड आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केल्या.
नकली नोटांनी लाचखोर आऊट -एसीबीने या कारवाईत अत्यंत हुशारीने सापळा रचला होता. लाचेच्या 30 हजारांच्या रकमेत 500 रुपयांच्या 36 खर्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या आणि उर्वरित रक्कम खेळण्यातील नकली नोटांच्या स्वरूपात होती. आरोपींना वाटले की खिसे गरम झाले पण प्रत्यक्षात त्यांनी स्वतःच्याच विनाशाला आमंत्रण दिले होते.




