राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

वाढीव भत्त्याचा लाभ जुलै 2025 पासून लागू होणार

मुंबई/25 फेब्रुवारी – राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांना महागाईच्या झळा सोसण्यासाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, यामुळे महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून थेट 58 टक्क्यांवर पोहोचला आहे. वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत यासंदर्भातील अधिकृत निवेदन सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचार्‍यांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. ही दरवाढ जुलै 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली असून, जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या चार महिन्यांच्या थकबाकीची रक्कम कर्मचार्‍यांना मार्च 2026 च्या पगारात दिली जाईल. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीबाबत सरकार लवकरच स्वतंत्र आदेश जारी करणार आहे.

Back to top button