विठुरायाच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणालीस प्रारंभ

औसेकर महाराज यांची माहिती

 * मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून दर्शन बुकिंगची सोय

पंढरपूर /15 जून: सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आता तासन् तास रांगेत उभे राहण्याची गरज लागणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर टोकन दर्शन  प्रणाली चाचणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. सुरुवातीला 26 जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. यामधील काही त्रुटी आणि बदल करून पुढे ही सुविधा सुरू करणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. समितीच्या संकेतस्थळावरून ही सुविधा सुरू असून भाविकांसाठी ऑफलाइन म्हणजेच दर्शनरांगेच्या माध्यमातून देखील दर्शन घेता येणार आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस प्रत्येक भाविकाला असते. तासन् तास दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घेतले जाते. मात्र तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आता पंढरीच्या विठुरायाचे दर्शन हे देखील आता सहज आणि तत्काळ होणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org  या संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या तारखेला, किती वाजता दर्शन घ्यायचे आहे त्याची वेळ निश्चित करून आणि आवश्यक ती माहिती भरून तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे. येथील नामदेव पायरीजवळील श्री संत ज्ञानेेशर दर्शन मंडप येथून या टोकनची पडताळणी करून घेणे व नंतर दर्शन हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल व वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश होऊन दर्शन होणार आहे. रोज 1 हजार 200 भाविकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत देवाचे उपचार, आरती वगळून प्रत्येक तासाला 200 भाविकांना दर्शन घेता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button