तरच विधान परिषदेत आमची लोक निवडून येतील

राऊतांची मविआला विनंती

मुंबई /8 फेब्रुवारी : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ 13 मे 2026 मध्ये संपणार आहे. विधान परिषदेच्या एकूण 9 जागा मे महिन्यात रिक्त होणार आहेत. ज्यामुळे ठाकरे पुन्हा परिषदेवर येतात की नाही, ते पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लढवतात की नाही, याबाबतची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषद निवडणूक लढवून राज्यासाठी आणि राज्यातील जनतेसाठी परिषदेवर यावे, अशी विनंती केल्याची माहिती राऊतांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (ता. 8 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील संपणार्‍या कार्यकाळाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी याबाबत म्हटले की, महाविकास आघाडीत एकमेकांना मदत करावीच लागेल. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि आमची शिवसेना (ठाकरे गट) आहे. त्यामुळे यापुढच्या विधानपरिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल. तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील. आम्ही सगळ्यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केलेली आहे, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे आणि त्यांनी विधिमंडळामध्ये पुन्हा जाणे हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे, अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यांनी विधिमंडळात पुन्हा जावे, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे, असे यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले.

Back to top button