पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी अभिवादन

आ.सुलभा खोडके यांची प्रमुख उपस्थिती

* जय मल्हारच्या जयघोषात टू व्हीलर रॅलीचे जागोजागी स्वागत

अमरावती/31 मे: प्रत्येक स्त्रीला जगण्याचे, लढण्याचे, स्वतःचे सामर्थ्य टिकवण्याचे धारिष्ट देणारे प्रेरणास्रोत म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आहे.लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या एक महान समाज सुधारक तर होत्याच आणि त्या आपल्या न्यायबुद्धी, परोपकार आणि धर्म परायणतेसाठी प्रसिद्ध होत्या. ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देऊन त्यांनी आपल्या मनगटातील व बुद्धीच्या जोरावर राज्य कारभार केला. त्या केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हत्या, तर महिलांच्या आत्मसन्मानासाठी आणि हक्कासाठी कायदेशीर पावले उचलणार्‍या भारतातील पहिल्या काही महिला राज्यकर्त्यांपैकी त्या एक होत्या.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे न्याय, सेवा, धर्मपरायणता आणि लोककल्याण यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांचा आदर्श राज्यकारभार आजही प्रशासनासाठी मार्गदर्शक मानला जातो. लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी त्यांची विचारसरणी आजच्या काळातही तितकीच महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवीनीं परोपकारी वृत्ती बाळगीत केलेली निर्माण कार्यें ही त्या काळात मंदिरे, रस्ते, घाट, धर्मशाळाच देशभरातील लोकांना आत्मीयतेने जोडण्याचे साधन होत्या.त्या सामान्य धार्मिक महिला नव्हत्या तर उच्च कोटीचे नैतिक सामर्थ्य असणार्‍या दूरदृष्टीच्या महाराणी होत्या. अहिल्यादेविंच्या प्रत्येक निर्माणकार्या मागे एक कथा आहे. मुत्सद्दीपणा, नैतिक सामर्थ्य आणि गरज पडली तर दबावही ही सारी अस्त्रे त्यांनी वापरली ती देशाच्या कानकोपर्‍यात राष्ट्रीयत्वाची भावना जोपासण्यासाठी. असे प्रतिपादन आ.सुलभा खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले. रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी अमरावती येथील नवसारी – व्हिएमव्ही – विद्युत नगर परिसर समीप राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, अमरावती येथे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कुशल प्रशासक पराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम आ.सुलभाताई संजय खोडके यांनी नमन – वंदन – पूजन तसेच माल्यार्पण करीत विनम्र अभिवादन केले.
यावेळी सर्व उपस्थित्यांच्यावतीने येळकोट येळकोट – जय मल्हार चा एकच जयघोष करण्यात आला.याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त खासकरून आयोजित टू व्हीलर रॅलीत सहभागी झालेल्या महिला भगिनींनी पिवळ्या रंगाचे फेटे व पारंपारीक वस्त्र परिधान करीत सहभाग नोंदवला होता. यादरम्यान राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रथारूढ प्रतिमेसमोर सकल धनगर समाजाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या म्युरलला पुष्पहार अर्पण करण्यात आला. टू व्हीलर रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत असताना जागोजागी या टू व्हीलर रॅलीचे अमरावती शहरवासियांचे वतीने स्वागत करण्यात आले. यादरम्यान जवाहर नगर परिसर स्थित स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या – क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या म्युरलला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर कठोरा नाका – शेगाव नाका – पंचवटी चौक – आरटीओ ऑफिस मार्गे ही रॅली मार्गस्थ झाली. याप्रसंगी राष्ट्रमाता – राजमाता माँ जिजाऊ यांच्या पुतळ्यास रॅलीतील सहभागी मान्यवरांनी माल्यार्पण केले. तदनंतर जिल्हाधिकारी कार्यालय – गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कुल चौक मार्गे जात असताना या रॅलीचे आयोजन – नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापन लक्षात घेता अमरावतीकरांनी या रॅलीला प्रतिसाद देत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रथारूढ प्रतिमेस वंदन केल्याचे दृश्य यावेळी दिसून आले. यादरम्यान इर्विन चौक येथील भारतीय घटनेचे शिल्पकार – भारतरत्न – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे टू व्हीलर रॅलीत सहभागी मान्यवरांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. या टू व्हीलर रॅलीच्या सुरुवातीपासून ते रॅलीची सांगता होईपर्यंत सकल धनगर समाज, अहिल्या महिला परिषद, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, जिल्हा शाखा – अमरावती, धनगर एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन तसेच अन्य संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button