खा.सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरूण लखानी यांना भाजपची उमेदवारी

विधान परिषदेसाठी भाजपचे 11 उमेदवार जाहीर

मुंबई/31 मे- महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाने (इगझ) महाराष्ट्र विधान परिषदेसाठी त्यांच्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. भाजपने 11 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा समावेश आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे अरून लखानी यांनाही वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषदेसाठी तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने या नावांना मंजुरी दिली असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीनं ही अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच विभागांतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधील तगड्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांना आता विधान परिषदेचं तिकीट देण्यात आलं आहे. दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्न ठरल्यानंतर त्यांचे होणारे सासरे अरुण लखानी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले होते. त्यांना भाजपकडून वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषदेसाठी तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. महायुतीने त्यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. 17 जागांमध्ये भाजप 11 जागा लढवणार आहे. त्यापाठोपाठ शिवसेना 4 जागांवर लढणार आहे. किमान सात जागा तरी आपल्याला मिळाव्यात यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू होते. शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी त्यासाठी चांगलाच जोरही लावला होता. जागावाटपाच्या या चर्चा दिल्लीपर्यंतही गेल्या. मात्र, शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या चार जागा आल्या आहेत. यामध्ये ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळच्या जागेचा समावेश आहे. यासोबत सुरूवातीला राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळणार, अशी चर्चा होती. मात्र, आता अंतिम जागावाटपानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि कोकण या 2 जागा आल्या आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर-अधिसूचना जारी : 25 मे, अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून, अर्जाची छाननी : 2 जून, अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून, मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4., मतमोजणी : 22 जून

संबंधित बातम्या

Back to top button