वृक्ष लागवडच नाही; संगोपनाचाही संकल्प करा

प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांचे हस्ते वृक्षारोपण

अमरावती /5 जून : विद्यापीठ परिसरात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यापीठाच्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा 30 लिंबांच्या रोपांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी विद्यार्थ्यांना केवळ झाडे लावण्याचेच नव्हे, तर ती जगवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
आजच्या काळात निसर्ग वाचवणे ही काळाची गरज असून, प्रत्येकाने एक झाड लावून ते वाढवण्याची जबाबदारी उचलावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.विद्यापीठ परिसरात सध्या पाच लाखांवर वृक्ष असून, यंदाच्या पावसाळ्यात उद्यान विभागामार्फत आणखी एक हजार नवीन झाडे लावली जाणार आहेत. तसेच, विद्यार्थ्यांच्या सहभागातून हजारो ’सीड बॉल्स’ (बीज गोळे) पेरण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तरुणाईकडे ऊर्जा आणि नवनवीन विचार आहेत. तुम्ही या पृथ्वीला अधिक सुंदर बनवू शकता. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केवळ मोठ्या कार्यक्रमांची गरज नाही, तर दैनंदिन जीवनातील छोटे बदल महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळून ऊर्जा आणि पाण्याची बचत करावी, असे मार्गदर्शन डॉ. ढोरे यांनी केले.याप्रसंगी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, नाविन्यपूर्ण संशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, रासेयो संचालक डॉ. निलेश कडू, कार्यकारी अभियंता श्रीकांत रोडगे, उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, डॉ. सुलभा पाटील, सौ. मोनाली तोटे पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, सहा. कुलसचिव डॉ. वीरेंद्र निमओ, अनिल मळम, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हेमलता नांदुरकर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत गावंडे, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. यादवकुमार मावळे, बायोटेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. अनिता पाटील, अधिसभा सदस्य डॉ. जयंत वडतकर, गाडगे बाबा अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे, डॉ. जी.जी. मुळे, उद्यान अधीक्षक भीमराव वाठोरे यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button