अमरावतीत चोवीस तासांत तिघांवर प्राणघातक हल्ले
शहरात गुन्हेगारांचा उच्छाद वाढला

* धारदार शस्त्रांनी तरुणांना केले लक्ष्य
* जुना वाद अन् प्रेमप्रकरणातून राडा
अमरावती /24 मार्च : अमरावती शहरात गेल्या 24 तासांत गुन्हेगारीने डोके वर काढले असून, वेगवेगळ्या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ’हाफ मर्डर’ म्हणजेच खुनाचा प्रयत्न केल्याच्या थरारक घटना घडल्या आहेत. जुन्या वैमनस्यातून आणि प्रेमप्रकरणाच्या वादातून झालेल्या या हल्ल्यांमध्ये चार जणांवर चाकूने सपासप वार करण्यात आले असून, तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. गाडगे नगर, फ्रेजरपुरा आणि नांदगाव पेठ या भागात या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संतोषी नगर परिसरात पहिली घटना घडली. येथील मयूर किशोर सोळंखे (20 वर्षे, रा. हनुमान मंदिराजवळ) या तरुणाला जुन्या वादातून सुनील विष्णू राठोड आणि अनुप नावाच्या तरुणांनी घेरले आणि त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. विशेष म्हणजे, जखमी मयूर सोळंखे याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्याला शहरातून तडीपार केले होते. मात्र, तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो शहरातच वावरत होता आणि याच काळात त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
दुसरीकडे, नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या गुणवंत वाडी परिसरात विशाल राजपूत आणि प्रथमेश नावाच्या दोन तरुणांवर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, या घटनेमागे प्रेमप्रकरणाचा वाद असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. तिसरी घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशोदा नगर येथे घडली. येथे राहुल धर्माळे याने त्याचे मित्र अंशू आणि यश यांच्यासह मिळून किसन दिवाकर (27 वर्षे) याच्यावर प्राणघातक हल्ला केला. खरं तर आरोपींचा वाद किसनच्या भावाशी होता, पण तो सापडला नाही म्हणून त्यांनी किसनवरच वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किसनला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात एकाच दिवशी घडलेल्या या तीन घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तडीपार गुन्हेगाराचा शहरातच वावर
गाडगे नगरमधील घटनेत जखमी झालेला मयूर सोळंखे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला तडीपार करण्यात आले होते. तरीही तो शहरात बिनधास्त फिरत होता, ही बाब पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.




