विदर्भाच्या मागासलेपणाला येथील नेतेच जबाबदार
अॅड.वामनराव चटप यांचा घणाघाती आरोप

* पश्चिम महाराष्ट्राने साधला विकास; विदर्भ अधांतरी
* वेगळे विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय
अमरावती/29 मार्च : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत बिकट असून राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहे. राज्याचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली असून, यात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पश्चिम महाराष्ट्राने विदर्भातील वीज, खनिजे, जंगल आणि शेती उत्पादनांचा वापर करून स्वतःचा विकास साधला, मात्र विदर्भाला विकासापासून वंचित ठेवले. विशेष म्हणजे, विदर्भाच्या आजच्या या दुरवस्थेला जितके पश्चिम महाराष्ट्राचे नेते कारणीभूत आहेत, तितकेच विदर्भातील नेतेही दोषी आहेत, असा घणाघाती आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. वामनराव चटप यांनी केला. येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख सभागृहात शनिवारी एका विशेष ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले आणि सहसंपादक नरेश निमजे यांच्या ‘महाराष्ट्रात राहण्याचा अनुभव व विदर्भ राज्याची अपरिहार्यता’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ड. वामनराव चटप होते, तर उद्घाटन नूतन विदर्भ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री सुरेंद्र भुयार, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, नरेश निमजे, रंजना मामर्डे, प्राचार्य डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, मुकेश मासुरकर, अरुण केदार, सुनील चोखारे, राजेंद्र आगरकर, रियाज भाई आणि सुषमा मुळे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना चटप पुढे म्हणाले की, विदर्भाला सर्व संकटांतून बाहेर काढायचे असेल, तर स्वतंत्र राज्य होणे हाच शेवटचा उपाय आहे. डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी नमूद केले की, स्वतंत्र विदर्भाची चळवळ जनमानसात पोहोचवण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे साधन ठरेल. 70 वर्षांपासून विदर्भ महाराष्ट्रात आहे, पण त्याचा हिशोब कुठेच लागत नाही. माजी मंत्री सुरेंद्र भुयार यांनी जांबुवंतराव धोटे आणि भाऊसाहेब साबळे यांच्या पदयात्रांची आठवण करून देत, तेलंगणा होऊ शकते तर विदर्भ का नाही, असा सवाल केला. लेखक डॉ. खांदेवाले यांनी खंत व्यक्त केली की, विदर्भात रोजगार नसल्याने तरुण मुले पुणे-मुंबईला जात आहेत, त्यामुळे नागपूर आणि अमरावती ही शहरे आता केवळ वृद्धाश्रम बनत चालली आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सरला सपकाळ, प्रकाश लड्ढा, डॉ. पद्मा राजपूत, डॉ. प्रवीण विधळे, शंकरपाळे, निळकंठ यावलकर, डॉ. सत्येंद्र गडपायले, कमल जाधव, कृष्णराव घोंगडे, दामोदर शर्मा, सुरेश जोंधळे, राजू अवताडे, गणेश पुसराम, ज्योती खांडेकर, प्रशांत नकाते, डॉ. झेलम कटोच, प्रा. शरद पुसतकर, मधुसूदन कोवे, मंजुषा तिरपुडे, सुनील साबळे, माधव गांवडे, अशोक हांडे, विलास धांडे, दिनेश ढवस, नाना देवडे, रमेश चंदनशिवे, प्रेम खासबागे, सतीश प्रेमलवार, दिलीप भोयर, पांडुरंग बिजवे, अनिल वानखडे आणि जीवन पाचगाडे यांच्यासह समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अन्यायाची 70 वर्षे-विदर्भात वीज निर्माण होऊनही येथील शेती अंधारात आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात विजेचा झगमगाट आहे. गोसेखुर्द सारखे प्रकल्प 70 वर्षांनंतरही अपूर्णच आहेत. संविधानातील कलम 3 नुसार केंद्र सरकारने विदर्भाला तातडीने न्याय देऊन स्वतंत्र राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी रेटून धरण्यात आली.




