लग्नाच्या किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या
अचलपूर-चांदूर बाजार मार्गावरील बेलज फाट्यावर वाद पेटला, रक्तांचे पाट वाहले

अचलपूर /20 मे: लग्नसमारंभातील किरकोळ वादातून निर्माण झालेल्या जुन्या वैमनस्याने अखेर भीषण स्वरूप धारण करत एका तरुणाचा बळी घेतला. अचलपूर-चांदूर बाजार मार्गावरील बेलज फाट्यावर मंगळवारी रात्री झालेल्या चाकूहल्ल्यात मोर्शी येथील राजेंद्रसिंग किसनसिंग बावरी (वय 32) यांची निर्घृण हत्या करण्यात आली, तर अशोकसिंग उर्फ गोलुसिंग बावरी (वय 36) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून बावरी समाजात शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, मोर्शी येथील आठवडी बाजार परिसरातील राजेंद्रसिंग बावरी यांचे कुटुंब परतवाडा येथे चुलत भावाच्या विवाह सोहळ्यासाठी आले होते. मंगळवारी दुपारी वाघामाता परिसरातूनवरात जात असताना नाचण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, मोर्शी येथील काही युवकांनी परतवाडा येथील विरुसिंग जयसिंग बावरी यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरण परतवाडा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते; मात्र परस्पर सामंजस्याने तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. त्यामुळे वाद मिटल्याचे समजले जात असतानाच रात्री भीषण घटना घडली.विवाह सोहळा आटोपल्यानंतर राजेंद्रसिंग बावरी व अशोकसिंग उर्फ गोलुसिंग बावरी हे दुचाकीने मोर्शीकडे रवाना झाले होते. रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास बेलज फाट्याजवळ काही युवकांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर राजेंद्रसिंग यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. मदतीसाठी धावलेल्या अशोकसिंग यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्रसिंग बावरी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर अशोकसिंग बावरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अमनसिंग नानकसिंग बावरी (20), कालुसिंग पापासिंग बावरी (25), विरुसिंग जयसिंग बावरी (35), अजयसिंग बिजलसिंग बावरी (27), धरमसिंग जयसिंग बावरी (27), कुलदीपसिंग बावरी (25), बिजलसिंग पटेलसिंग बावरी (52), नानकसिंग पटेलसिंग बावरी (45), अभयसिंग नानकसिंग बावरी (18) आणि कनिल उर्फ चिमणी जांभेकर बावरी (19) यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष ठाकरे, ठाणेदार सुरेश म्हस्के आणि पीएसआय विशाल नवगिरे करीत आहेत.




