बिडी अर्पण केल्यावरच सुरू होतो प्रवास

मेळघाटात राजदेवबाबाची अनोखी परंपरा अन् इतिहास

* आदिवासी बांधवांकडून श्रद्धेने जोपासली जाते संस्कृती

मेळघाट /8 एप्रिल– सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील निसर्ग जेवढा सुंदर आहे, तेवढीच येथील लोकसंस्कृती आणि परंपरा विस्मयकारक आहेत. घनदाट जंगलातून प्रवास करताना संकट येऊ नये आणि वनदेवतेचा आशीर्वाद पाठीशी राहावा, यासाठी राजदेवबाबाला ’बिडी’ अर्पण करण्याची एक अनोखी प्रथा आजही तितकीच जिवंत आहे. अचलपूर, धारणी आणि अकोट मार्गाच्या तिटकीवर वडाच्या झाडाखाली विराजमान असलेल्या या देवस्थानाला मेळघाटातील आदिवासी बांधव श्रद्धेने ’बिडीवालेबाबा’ म्हणून ओळखतात.
विशेष म्हणजे, या मूर्तीचे मुख उघडे असून त्यात पेटती बिडी किंवा सिगारेट ठेवूनच प्रवासाची पुढची वाट धरली जाते. या अनोख्या श्रद्धेमुळेच या भागात आजही वाघ किंवा अन्य हिंस्र प्राण्यांपासून प्रवाशांचे रक्षण होते, अशी जनभावना आहे. सेमाडोह ते हरिसाल मार्गावर व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ राजदेवबाबांचे हे छोटेसे मंदिर आहे. या मूर्तीचे स्वरूप अत्यंत आगळेवेगळे असून दीड ते दोन फूट उंचीच्या या मूर्तीचे पाय वाघासारखे, तर चेहरा पक्षी आणि मानवाचा मिलाफ असल्यासारखा दिसतो. मेळघाटातील इतिहास अभ्यासक शिवा काळे यांच्या मते, प्राचीन काळी हा मार्ग उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा मुख्य राजमार्ग होता. त्यावेळी या मार्गावर लुटारू आणि जंगली प्राण्यांची मोठी भीती असायची. नरनाळा किंवा गाविलगड किल्ल्यावरील सैनिकांची येथे सुरक्षा चौकी असायची. प्रवाशांना संरक्षण देण्यासाठी त्याकाळी काही शुल्क आकारले जायचे आणि सर्वांना एकत्र करून पुढे सोडले जायचे. याच परंपरेचे रूपांतर पुढे राजदेवबाबाला काहीतरी अर्पण करण्याच्या प्रथेमध्ये झाले, जी आज बिडी अर्पण करण्याच्या रूपात पाहायला मिळते. या भागात केवळ राजदेवबाबाच नव्हे, तर बेलकुंड आणि तारुबांदा मार्गावर डोलारबाबांचे देखील असेच स्थान आहे. बेलकुंड बाबांची मूर्ती देखील राजदेवबाबांसारखीच असून तिथेही बिडी अर्पण करण्याची प्रथा आहे. स्थानिक नागरिक या मूर्तींना ’कुला मामा’ म्हणजेच वाघाचे प्रतीकात्मक रूप मानतात. खोंगडा वनपरिक्षेत्रातील कर्मचारी दादू कासदेकर सांगतात की, आदिवासी बांधव केवळ प्रवासाच्या वेळीच नव्हे, तर घरातील मंगल कार्याची पहिली पत्रिका देखील याच देवाच्या चरणी अर्पण करतात. मेळघाटातील जाणकार मनोज शर्मा यांच्या मते, ही केवळ एक अंधश्रद्धा नसून जंगलाशी आणि निसर्गाशी नाते सांगणारी एक प्राचीन परंपरा आहे. आजही या घनदाट अरण्यातून प्रवास करताना प्रत्येक वाहनचालक येथे क्षणभर थांबून बिडी पेटवून बाबाला अर्पण करतो आणि मगच निर्भयपणे जंगलाचा प्रवास पूर्ण करतो.

संबंधित बातम्या

Back to top button