अमरावतीत तरुणीवर सामूहिक अत्याचार; पाच नराधम जेरबंद
भानखेडा शिवारात मित्राला बेदम मारहाण

* जंगलात गाठून लुटले शंभर सव्वाशे रुपये
अमरावती /29 मार्च : शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या भानखेडा मार्गावरील जंगल परिसरात एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी, 28 मार्च 2026 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पीडिता आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना पाच अज्ञात इसमांनी त्यांना अडवले.
या टोळीने आधी दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यांच्याजवळील 120 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर एका नराधमाने तरुणीला बाजूला ओढत नेऊन तिच्यावर बळजबरीने अतिप्रसंग केला. या संतापजनक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, फ्रेजरपुरा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत पाचही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंद क्रमांक 189/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 70 (1), 77, 127 (2), 310 (2) आणि 351 (3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही घटना अत्यंत संवेदनशील असल्याने पोलिसांनी पीडितेची किंवा साक्षीदारांची ओळख उघड न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पीडित तरुणीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी घडलेल्या या लुटमारीच्या आणि अत्याचाराच्या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई
सदर गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने पीडितेची, साक्षीदारांची किंवा आरोपींची कोणतीही माहिती पोलीस कार्यालयाच्या अधिकृत परवानगी शिवाय प्रसारित करू नये. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद प्रशासनाने दिली आहे.




