आशियाई स्पर्धेतील विजेत्यांच्या स्वागताकडे क्रीडाविभागाची पाठ
जिल्हाधिकारी, महापौर, एसीपीचे फोटोसेशन

अमरावती /5 ऑक्टोबर – आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळविणार्या कुमकुम मोहोड, भारती फुलमाळी आणि यशदीप भोगे यांच्या अमरावतीतील स्वागत सोहळ्याला अपेक्षित गर्दी झाली नाही. राजकमल चौकातील सीताराम मार्केटमधे स्वागताची तयारी करण्यात आली होती. मात्र नागरिकांची उपस्थिती कमी राहिल्याने कार्यक्रमाचा उत्साह काहीसा ओसरलेला दिसला. जिल्हाधिकारी आशीष येरेकर, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, क्रीडा संचालक अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र स्वागत सोहळ्याच्या नियोजनावरच क्रीडाप्रेमींनी प्रश्न उपस्थित केले.
मणिबाई गुजराती शाळेतील कुमकुम मोहोड ही विद्यार्थिनी असल्याने तिच्या स्वागतासाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचीही चांगली गर्दी झाली होती. कुमकुम मोहोड राजकमल चौकात पोहोचताच उपस्थितांनी पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत केले. भारतमातेचा जयघोषही करण्यात आला. खा. डॉ. अनिल बोंडे आपल्या भगिनी संगीता शिंदे यांच्यासह उपस्थित होते. महापौर श्रीचंद तेजवानी काही वेळाने कार्यक्रमस्थळी आले. आ. सुलभा खोडके यांनी आशियाई क्रीडा विजेत्या खेळाडूंसाठी आकर्षक पुष्पगुच्छ, शाल आणि भेटवस्तू आणल्या होत्या. त्यांच्या समवेत अनेक नगरसेवक आणि समर्थकही उपस्थित होते. ढोलताशांचा गजर आणि आतषबाजीचीही तयारी करण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक काही वेळ मंचावर थांबून आपल्या सरकारी वाहनातून निघून गेले. त्यानंतर स्वागत मिरवणूक राजकमल चौकातून विभागीय क्रीडा संकुलापर्यंत नेण्यात आली. मार्गात नागरिकांनी दोन्ही खेळाडूंचे स्वागत केले. अमरावतीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणार्या खेळाडूंच्या स्वागतासाठी अधिक चांगले नियोजन व्हायला हवे होते, अशी भावना अनेक क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली. स्वागत सोहळा अपेक्षेइतका प्रभावी न झाल्याची चर्चा शहरात रंगली होती. कुमकुम मोहोडने सुवर्णपदकासोबत आगामी ऑलिंपिक स्पर्धेसाठीही पात्रता मिळविल्याने तिच्या यशाचे महत्त्व अधिक वाढले आहे. अशा खेळाडूंच्या स्वागतासाठी शहरातील शाळा आणि नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेता आले असते, अशीही चर्चा होती.





