‘शिवाजी’ची श्रुतिका कडू मेहंदी स्पर्धेत अव्वल

अमरावती/5 ऑक्टोबर : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे बुलढाण्याच्या राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव 2026 (’युवा संस्पर्श’) मध्ये अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाची विद्यार्थिनी श्रुतिका नरेंद्र कडू हिने मेहंदी या कला प्रकारात विद्यापीठ स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या युवा महोत्सवातील मेहंदी स्पर्धेत सुमारे 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत श्रुतिकाने गणपती बाप्पा व भारतीय संस्कृतीचा मिलाफ दर्शविणारी मेहंदी साकारून उत्कृष्ट कलेच्या जोरावर पहिला क्रमांक मिळवला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या युवा महोत्सवात तिने द्वितीय क्रमांक मिळवला होता. याशिवाय, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन करत सलग सहाव्यांदा युवा महोत्सवाची चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली असून, या विजयात श्रुतिकाच्या यशामुळे मोलाची भर पडली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.





