अमरावतीत महानगरपालिकेच्या नव्या भव्य वास्तूसाठी 100 कोटींचा प्रस्ताव

उपमहापौर सचिन भेंडे यांनी केली नवीन तहसिलच्या बाजूला जागेची पाहणी

* जागा निश्चित, प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर

अमरावती /17 फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होणार्‍या अमरावती महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला पुढे नेत नवीन तहसिलच्या बाजूला जागेची पाहणी करण्यात आली असून संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
या पाहणीवेळी आमदार रवि राणा, माजी खासदार नवनीत राणा यांच्या आदेश व निर्देशानुसार अमरावती महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन भाऊ भेंडे, गटनेते नानाभाऊ आमले, युवा स्वाभिमान पार्टीचे अजयभाऊ जयस्वाल तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सहाय्यक संचालक नगररचना सागर वानखडे, प्रतिनिधी तहसीलदार, प्रीतम रामटेके, मालमत्ता अधिकारी सचिन मांडवे आणि इतर अधिकारी-कर्मचारी यांचीही उपस्थिती होती. पाहणीदरम्यान महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय वास्तूसाठी योग्य जागा निश्चित करण्यात आली. या जागेबाबतचा सविस्तर प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला असून पुढील प्रशासकीय प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.या प्रकल्पासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नवीन इमारत उभारल्यानंतर नागरिकांना अधिक सुसज्ज व आधुनिक सुविधा मिळणार असून प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.अमरावतीच्या सर्वसामान्य जनतेसाठी ही नवीन वास्तू लवकरात लवकर उभी राहील, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

संबंधित बातम्या

Back to top button