अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयोगातून प्रबोधनाची गरज
विजय डवरे यांचे प्रतिपादन, महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे शक्य

अमरावती /6 ऑक्टोबर : समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी केवळ भाषणांमधून प्रबोधन न करता प्रत्यक्ष चमत्कारांचे प्रयोग करून त्यामागील वैज्ञानिक कारणे समजावून सांगणे आवश्यक आहे. चमत्कार प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी, महिला आणि नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अमरावती शहर शाखेच्या वतीने दि. 4 ऑक्टोबर 2026 रोजी गुरुदेव सेवाश्रम, राधा नगर, अमरावती येथे चमत्कार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रशिक्षक प्रमोद कोलमकर यांनी विविध चमत्कारांचे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखविले. या प्रयोगांमागील वैज्ञानिक तत्त्वे, मानवी मनाची भूमिका तसेच चमत्कारांच्या नावाखाली केली जाणारी फसवणूक याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे, प्रशिक्षणार्थींनाही विविध प्रयोग स्वतः करून पाहण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे चमत्काराकडे आश्चर्य किंवा भीतीने पाहण्याऐवजी त्यामागील वैज्ञानिक कारण शोधण्याची सवय निर्माण करण्यावर कार्यशाळेत भर देण्यात आला. ‘चमत्कार नाही, त्यामागे विज्ञान आहे’ हा विचार प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून सहभागींपर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यशाळेदरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, विवेकवादी विचार आणि संविधानिक मूल्ये याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत व्यसनमुक्ती प्रबोधन परदर्शनी तसेच संविधान जागर प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनातून व्यसनांचे दुष्परिणाम, अंधश्रद्धेमुळे निर्माण होणार्या सामाजिक समस्या आणि संविधानाने दिलेली वैज्ञानिक दृष्टिकोनाची मूल्ये याबाबत जनजागृती करण्यात आली.





