शहरात धोकादायक व निष्क्रिय केबल्स हटविण्याची महानगरपालिकेची मोहीम सुरू
अनेकांवर दंडात्मक कारवाईचे संकेत

अमरावती /25 मार्च : शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने वापरात नसलेल्या व धोकादायक केबल्स हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः कॉटन मार्केट ते इर्विन चौक या प्रमुख मार्गावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रस्त्यांवरील अडथळे कमी होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे.
महानगरपालिकेच्या पथकाने शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच रहिवासी भागांमध्ये लोंबकळणार्या आणि निष्क्रिय झालेल्या केबल्सची पाहणी केली. अनेक ठिकाणी केबल्स झाडांवर, वीज खांबांवर तसेच इमारतींवर अव्यवस्थितपणे टांगलेल्या आढळून आल्या. या केबल्समुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने त्यांना तातडीने हटविण्यात आले. अधिकार्यांनी सांगितले की, काही केबल ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. संबंधितांना याबाबत नोटिसा देण्यात येणार असून, भविष्यात नियमभंग आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. महानगरपालिकेने नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन केले आहे. ज्या भागात धोकादायक किंवा वापरात नसलेल्या केबल्स दिसून येतील, त्याची माहिती महानगरपालिकेला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे शहर अधिक सुरक्षित आणि सुबक होण्यास मदत होणार असून, पुढील काही दिवसांत ही कारवाई आणखी व्यापक करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.




