खरा पंतप्रधान कोण, देशाला दाखवू
राहुल गांधींच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

नवी दिल्ली/31 मार्च– केरळमधील पेरांब्रा येथे झालेल्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत मोठे विधान केले. काळजी करू नका, काहीही झाले तरी काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींना पकडणारच. ते कितीही वेगाने किंवा कितीही दूर पळाले तरी शेवटी आम्ही त्यांना पकडू आणि देशाला दाखवू की खरे पंतप्रधान कोण आहेत, असे गांधी म्हणाले.
याआधी कोट्टायम येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या एका करारामुळे शेतकर्यांचे हक्क कमी झाले आहेत. पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानांनी भारताची शेती आंतरराष्ट्रीय बाजारासाठी खुली केली आहे, असा दावा त्यांनी केला. ऊर्जा सुरक्षेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, या निर्णयामुळे भारताची ऊर्जा स्वायत्तता धोक्यात आली असून, आता देशाला पेट्रोल-डिझेल खरेदी करताना स्वातंत्र्य उरलेले नाही. भारताला तेल खरेदी करायचे असेल, तर आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची परवानगी घ्यावी लागते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशी टीकाही त्यांनी केली.




