मेळघाटातील आरोग्य सुविधांवर अधिक लक्ष

’मीट द प्रेस’ मध्ये जिप सीईओ सत्यम गांधी यांचा संवाद

’जेन झी’ला दिला कानमंत्र

कठीण परिश्रम आणि आत्मप्रेरणेने मिळते यश

अमरावती /13 ऑगस्ट- मेळघाटातील कनेक्टिव्हिटीचा अभाव हा विकासातील महत्त्वाचा अडथळा असल्याची बाब जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांनी मान्य करत या भागात आरोग्य सुविधा सुधारल्याचे म्हटले आहे. आरोग्य क्षेत्रात चांगले काम झाले आहे. मेळघाटातील बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. संस्थात्मक प्रसुती वाढल्या असून आरोग्य क्षेत्रात मिशन 28 च्या माध्यमातून काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या भागातील आरोग्य सुविधांवर आपला भर असल्याचेही सीईओ गांधी यांनी स्पष्ट केले.

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात आयोजित ’प्रेस मीट’ कार्यक्रमात सत्यम गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी भूषवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव प्रफुल्ल माणिकराव ढवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. लोभस घडेकर यांनी केले. आपल्या संवादात सत्यम गांधी यांनी सांगितले की, आजची ’जेन जी’ सोशल मीडियाच्या प्रभावाखाली वेगाने येत आहे. युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर मिळणारे ’मोटिव्हेशन’ हे केवळ काही काळापुरतेच असते. वास्तविक यशासाठी ’इंटरनल मोटिव्हेशन’ (आत्मप्रेरणा) सर्वात जास्त आवश्यक आहे. ते म्हणाले की, जर व्यक्तीच्या मनात काहीतरी मिळवण्याची तीव्र इच्छा आणि दृढ संकल्प असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य राहत नाही. तरुणांना विशेष सल्ला देताना ते म्हणाले की, 18 ते 25 वर्षे वयाचा काळ हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो.
या काळात मोबाईल फोन आणि सोशल मीडियापासून जितके दूर राहाल, तितके उत्तम. या वेळेचा उपयोग वर्तमानपत्रे वाचणे, चांगल्या पुस्तकांचा अभ्यास करणे, ज्ञान वाढवणे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी केला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, यश मिळाल्यानंतर सोशल मीडियाचा वापर केला जाऊ शकतो, परंतु यशापूर्वी त्याचा अतिवापर तरुणांचे लक्ष विचलित करतो आणि त्यांच्या मौल्यवान वेळेचा अपव्यय करतो.
दरम्यान सत्यम गांधी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये पाणी, वीज आणि चांगली इमारत उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. सर्व सुविधांनी युक्त अंगणवाड्या उभारण्याबरोबरच मेळघाटातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रं ’स्मार्ट’ करण्याचा मानस आहे. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, मेळघाटातील 10 अंगणवाड्या मॉडेल अंगणवाड्या म्हणून विकसित करणे तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक ’ड्रोन दीदी’ तयार करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ’मेळघाटची परिस्थिती निश्चितच बदलली आहे; मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्याची गरज आहे,’ असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना सत्यम गांधी यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची माहिती दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी, आईच्या उपचारासाठी घेतलेले कर्ज, स्पर्धा परीक्षेतील अपयश या बाबींवर मात करत यूपीएससी परीक्षेत अखिल भारतीय स्तरात दहावा क्रमांक मिळवल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी सांगितले. ते म्हणाले, घरची परिस्थिती बेताची होती. मात्र, आजोबांची इच्छा होती की घरातील कोणीतरी आयएएस व्हावे. पाचवीपासूनच आजोबांनी दररोज सकाळी वृत्तपत्र वाचण्याची सवय लावली. नवोदय विद्यालयाची परीक्षा आपण अनुत्तीर्ण झालो होतो परंतु मनाने हार मानली नाही. बारावीनंतर स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचे निश्चित केले होते. एनडीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तब्बल 11 दिवस वैद्यकीय चाचणी झाली; मात्र त्यामध्ये कलर ब्लाइंडनेस असल्याचे निदान झाले आणि तिथेही अपयश आले. मात्र या अपयशाने निराश न होता, ’आपल्यासाठी अजून एखादी संधी वाट पाहत आहे,’ असा सकारात्मक विचार केला आणि यूपीएससी ची तयारी सुरू केली, असे गांधी यांनी सांगितले.दिल्ली येथे जाऊ नयूपीएससीची तयारी केली. ’टेस्ट मॅच नाही, तर टी-20 खेळायची’ या निर्धाराने तयारीला सुरुवात केली. कोणतेही काम करताना शंभर टक्के प्रयत्न केले पाहिजेत आणि आपण आपल्या क्षमतेत कमी पडता कामा नये, या विचाराने तयारी केल्याचे त्यांनी सांगितले.
यूपीएससी परीक्षेच्या तयारीदरम्यान तीन वेळा कोविडची लागण झाली. मात्र प्रत्येक वेळी पुन्हा उभे राहत तयारी सुरू ठेवली. मुलाखतीपूर्वीही कोविड झाला; तरीही मुलाखत दिली. अवघ्या 15 मिनिटांत मुलाखत संपली. यूपीएससीमध्ये अखिल भारतीय स्तरात दहावा क्रमांक मिळाला. डहाणू येथे प्रकल्प अधिकारी म्हणून पहिली नियुक्ती, त्यानंतर सांगली महानगरपालिकेचे आयुक्त आणि आता अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा आपला प्रशासकीय प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले.

जमीनदार घराण्याशी संबंध
सत्यम गांधी यांचा जन्म 14 जुलै 1999 रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील दिघरा गावातील एका जमीनदार घराण्यातील गोंदी कुटुंबात झाला. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सत्यम यांचे वडील अखिलेश सिंह हे सरकारी कर्मचारी होते. सत्यम यांचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले, त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी दिल्लीच्या दयाल सिंह कॉलेजमध्ये गेले. त्यांनी 2020 मधील पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतात 10 वा क्रमांक मिळवला. सत्यम गांधी यांना एक लहान भाऊदेखील आहे. त्यांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांतून परीक्षा दिली होती. त्यांनी कोणत्याही मोठ्या क्लासरूम कोचिंगशिवाय स्व-अभ्यास आणि अचूक रणनीतीच्या जोरावर हे ऐतिहासिक यश मिळवले. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा देणारे ते विद्यार्थी ठरले.

संबंधित बातम्या

Back to top button