पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये हल्ला
गुरुद्वारात दर्शनासाठी आले होते सुखबीर सिंह बादल

हल्लेखोर निहंगाला पोलिसांनी केली अटक
मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
नांदेड /13 ऑगस्ट: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर आज गुरुवारी (13 ऑगस्ट) नांदेड येथील तख्त श्री हजूर साहिब परिसरातील माता साहिब गुरुद्वाराजवळ जीवघेणा हल्ला करण्यात आला. सुखबीर बादल हे कुटुंबीयांसह नांदेडमधील गुरुद्वारात दर्शनासाठी आले असताना हा प्रकार घडला. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेनंतर हल्लेखोराला सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार त्याची ओळख 62 वर्षीय जसपाल सिंह अशी झाली असून तो गेल्या दोन वर्षांपासून त्याच गुरुद्वारा परिसरात राहत होता, अशी माहिती समोर आली आहे.
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल हे आपली पत्नी आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह गुरुद्वारात आले होते. गुरुद्वारात आल्यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका निहंगाने कृपाणाने त्यांच्या हातावर आणि खांद्यावर वार केला. यावेळी चार निहंग तिथे उपस्थित होते. बादल यांच्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून हल्लेखोराला बाजूला केले. हल्लेखोर निहंगाला पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. परंतु, या घटनेनंतर बादल यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या हातावर तख्त साहिब गुरुद्वारात सत्कारानिमित्त मिळालेला सिरोपा (सन्मानवस्त्र) गुंडाळलेले दिसत आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. फडणवीस यांनी सुखबीर सिंह बादल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. हल्ल्यामागील नेमका हेतू, सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्या का आणि हल्लेखोर बादल यांच्या इतक्या जवळ कसा पोहोचला, या सर्वबाबींचा तपास केला जात आहे. घटनेनंतर गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत असून, पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.




