माझ्या व्यंगावर बोलून न्याय मिळत असेल, तर…

महसूल मंत्री बवानकुळे यांचा जरांगे पाटील यांच्यावर निशाणा, आकडेवारीसह भूमिका मांडली

पुणे /13 ऑगस्ट  :  माझ्या शरीरावर, चेहर्‍यावर किंवा व्यंगावर बोलून मनोज जरांगे यांना आनंद मिळत असेल आणि त्यातून समाजाला न्याय मिळणार असेल, तर त्यांनी माझी जरूर टिंगलटवाळी करावी, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या टीकेचा समाचार घेतला.
ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. जरांगे यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या वैयक्तिक हल्ल्यांवर, शारीरिक व्यंगावरील टीकेवर आणि महसूल खात्यावर केलेल्या आरोपांवर बावनकुळे यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, मी कधीही मराठा विरुद्ध ओबीसी अशा वादात पडलेलो नाही. मी कोणाबद्दलही आकस ठेवलेला नाही.मनोज जरांगे यांनी महसूल खात्याच्या एका चौकशी पत्रावरून केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना बावनकुळे यांनी आकडेवारीसह भूमिका मांडली. राज्य सरकारने गेल्यातीन वर्षांत 22 लाख 20 हजार 500 कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे दिली आहेत. या दाखल्यांपैकी केवळ एका दाखल्याबाबत तक्रार आल्यामुळे 7 दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. कोणताही दाखला रद्द करण्याचे आदेश दिले नव्हते. महसूल खात्याने एकही दाखला रद्द केलेला नाही. जात वैधता देणे हे सामाजिक न्याय विभागाचे काम असते, महसूल खात्याचे काम फक्त प्रमाणपत्र देणे आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. जरांगे यांचा जेव्हा जेव्हा मला फोन आला, तेव्हा मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. पण एका पत्रावरून गैरसमज पसरवला गेला, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button