अंजनगावच्या तरुणाला इबोला सदृश लक्षणे
युगांडा विमानतळावर संसर्ग झाल्याचा संशय

आज नागपूर एम्सच्या रुग्णालयात दाखल करणार
जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
लोकांनी भीती बाळगू नये – डीएचओ
अमरावती/13ऑगस्ट : केनियाहून अंजनगाव सुर्जी येथे आलेल्या एका 32 वर्षीय तरुणाने युगांडा विमानतळावर काही काळ घालवला. त्यानंतर तो घरी आल्यानंतर त्याला संसर्गजन्य रोगाची लक्षणे आढळल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाला संशयास्पद विषाणू रुग्ण म्हणून तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू असून, उद्या शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी नागपूरच्या एम्समध्ये त्याला दाखल केले जाणार आहे.अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोळा या गावातील एक 32 वर्षीय तरुण केनिया देशात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. दि. 8 रोजी केनियावरून विमानप्रवास करताना त्याचा युगांडा विमानतळावर थांबा झाला होता. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्मवर (आयएचआयपी) ही माहिती अपलोड केली. दरम्यान, सदर तरुण दि. 9 रोजी आपल्या घरी पोहोचला.
हंतोळा गावात आल्यानंतर त्याला सर्दी, खोकला आणि ताप जाणवू लागला. त्याने स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेत घरीच उपचार सुरू केले. मात्र, जेव्हा ताप वाढला तेव्हा त्याने सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअरचे डॉ. राजेश धुर्डे यांना प्रकृती दाखवली. दरम्यान, त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने रुग्णाच्या हिस्ट्रीनुसार डॉक्टरांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला.
आयएचआयपी प्लॅटफॉर्मवर अंजनगाव सुर्जी येथील प्रवाशाची माहिती अपलोड झाली होती. ही बाब जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या लक्षात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी तातडीची पावले उचलली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारीसे यांनी संबंधित रुग्णालयाला याबाबतची सूचना दिली. रुग्ण हा संसर्गजन्य आजाराचा असू शकतो, या शक्यतेवर आरोग्य विभागाने काम सुरू केले. विदेशातून येणार्या प्रवाशांमध्ये संसर्गजन्य रोगाची लक्षणे दिसल्यास त्यांना मुंबई, पुणे किंवा नागपूर येथील विशेष रुग्णालयांमध्ये दाखल केले जाते. संबंधित रुग्णाला उद्या, शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट रोजी नागपूर येथील एम्समध्ये दाखल केले जाणार आहे.
युगांडातून येणार्या रुग्णाबाबत भीती
युगांडा देशातून येणार्या रुग्णाबाबत जनसामान्यांमध्ये प्रचंड भीती आहे. 14 मे 2026 रोजी डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ काँगोच्या इतुरी प्रांतात इबोलाच्या साथीची नोंद झाली. ती डीआरसीमधील 17वी इबोला साथ होती. मागील साथ संपल्यानंतर केवळ पाच महिन्यांत पुन्हा ही साथ सुरू झाली. युगांडाची राजधानी कंपाला येथेही रुग्ण सापडले. ऑगस्ट 2026 च्या सुरुवातीपर्यंत ही साथ आतापर्यंतची सर्वाधिक वेगाने वाढणारी आणि दुसरी सर्वांत मोठी इबोला साथ बनली होती.
इबोलाची भीती का?
इबोला हा विषाणूजन्य आजार असून त्याचा मृत्यूदर खूप जास्त आहे. सिद्ध उपचारपद्धती आणि परिणामकारक लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक लोकांना या संसर्गाची भीती वाटते. गेल्या 38 वर्षांत आफ्रिकेत वेळोवेळी इबोलाचा प्रादुर्भाव झाला आहे. युगांडामध्येही अनेक मृत्यू झाले आहेत. इबोला संसर्गात मृत्यूचा धोका 25 ते 90 टक्क्यांपर्यंत असू शकतो.
इबोलाची लक्षणे…
इबोला विषाणूची लागण झाल्यानंतर 2 ते 11 दिवसांत शरीरात लक्षणे दिसू लागतात. याची सुरुवात अचानक ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधे दुखणे, तीव्र थकवा आणि घसा खवखवणे यांसारख्या फ्लूसदृश लक्षणांनी होते. पुढे ही लक्षणे गंभीर होत जातात. त्यावेळी मळमळ आणि उलट्या, उलट्यांमध्ये रक्त पडणे, पोटदुखीसह तीव्र अतिसार आणि जुलाब, त्वचेवर पुरळ, किडनी आणि यकृताचे कार्य बिघडणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसू शकतात. रुग्ण अतिगंभीर झाल्यास नाक, तोंड, हिरड्या आणि डोळ्यांतून अस्पष्ट रक्तस्राव होणे, शरीरात अंतर्गत रक्तस्राव होणे, काळे डाग पडणे, गोंधळ उडणे, अस्वस्थता आणि मानसिक संतुलन बिघडणे अशी लक्षणे दिसू शकतात.
उद्या रुग्णाला एम्समध्ये हलविणार – जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारसे यांनी सांगितले की, अंजनगाव सुर्जी येथील या रुग्णाला उद्या आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेतून नागपूर येथील एम्समध्ये दाखल करण्यात येईल. पुढील उपचार एम्समधील डॉक्टरांकडून केले जातील.
इबोलाचे निदान
इबोलाचे निदान करणे कठीण आहे. कारण त्याची सुरुवातीची लक्षणे टायफॉइड आणि मलेरियाच्या तापासारखीच असतात. डॉक्टर त्वरित रक्ताची चाचणी करतात. एन्झाइम-लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट अॅसे , रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिअॅक्शन यांसारख्या चाचण्यांच्या माध्यमातून निदान केले जाते.
इबोलावरील उपचार
इबोलावर उपचार उपलब्ध आहेत. मात्र, रुग्णाची लक्षणे लक्षात घेऊन उपचार केले जातात. शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखणे, ऑक्सिजन देणे, रक्तसंसर्गावर उपचार करणे, रक्तदाबाची पातळी योग्य ठेवणे तसेच विकसित होणार्या कोणत्याही संसर्गावर उपचार करणे, अशा पद्धतीने रुग्णावर उपचार केले जातात.
संबंधित रुग्णाला इबोला असण्याची शक्यता आहे का?
या प्रश्नावर डॉ. पारसे म्हणाले की, अशा कोणत्याही निश्चित आजाराबाबत सध्या काहीही सांगता येणार नाही. जोपर्यंत योग्य चाचण्या होत नाहीत, तोपर्यंत रुग्णाला कोणता आजार झाला आहे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये.
रुग्ण उपचारासाठी तयार नव्हता
केनियातून आलेला आणि युगांडा येथे थांबलेला अंजनगावचा प्रवासी तरुण संसर्गजन्य विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यानंतर नागपूर येथे उपचार घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य अधिकार्यांनी सांगितले. मात्र, संबंधित रुग्ण सुरुवातीला उपचारासाठी तयार नव्हता. आरोग्य अधिकार्यांनी रुग्णाचे समुपदेशन केले. त्यानंतर रुग्ण उपचारासाठी तयार झाला.




