कर्जमुक्ती योजनेसाठी तीन लाख शेतकर्‍यांची माहिती सादर

कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा, नियमित कर्ज भरणार्‍या 93 हजार शेतकर्‍यांना लाभ

अमरावती/29 जून: शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राज्य शासनाने जाहिर केली आहे. यात सुमारे तीन लाख शेतकर्‍यांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली आहे. यात 12 प्रमुख बँकांमधील 2 लाख 2 हजार थकीत कर्जदार आणि 93 हजार नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील 12 प्रमुख बँकांतर्गत एकूण 2 लाख 2 हजार 167 शेतकरी खाती या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरली आहेत. यातील रक्कम सुमारे 2338 कोटी रुपये होणार आहे. तसेच वेळेवर कर्जाची परतफेड करणार्‍या 93 हजार 139 शेतकरी खात्यांना 50 हजार रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी 524 कोटी रक्कम कळविण्यात आली आहे. बँकनिहाय आकडेवारीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत सर्वाधिक 71 हजार 655 खात्यांची 700 कोटी रुपयांची रक्कम कळविण्यात आली आहे. त्याखालोखाल स्टेट बँक ऑफ इंडियातील 41 हजार 135 खात्यांच्या 513 कोटी रूपयांची रक्कम आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या 29 हजार 980 खात्यांना 488 कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम कळविण्यात आली आहे. तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 29 हजार 10 शेतकर्‍यांचे 298 कोटी, बँक ऑफ बडोदाचे 3 हजार 102 शेतकर्‍यांचे 47 कोटी, बँक ऑफ इंडियाचे 7 हजार 183 शेतकर्‍यांचे 80 कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाचे 6 हजार 170 शेतकर्‍यांचे 76 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 2 हजार 83 शेतकर्‍यांचे 29 कोटी, युको बँकेचे 518 शेतकर्‍यांचे 5 कोटी, पंजाब नॅशनल बँकेचे 2 हजार 182 शेतकर्‍यांचे 8 कोटी, कॅनरा बँकेचे 1 हजार 902 शेतकर्‍यांचे 9 कोटी, इंडियन बँकेचे 7 हजार 247 शेतकर्‍यांचे 82 कोटी रूपयांच्या कर्जमाफीची रक्कम कळविण्यात आली आहे. वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी प्रत्येक शेतकर्‍यांना 50 हजार रूपयांचा लाभ देण्यात येणार आहे. प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्येही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक 48 हजार 869 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांना 244 कोटी रूपयांचे प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 10 हजार 390 शेतकर्‍यांना 51 कोटी, बँक ऑफ बडोदाचे 2 हजार 691 शेतकर्‍यांना 43 कोटी, बँक ऑफ इंडियाचे 1 हजार 733 शेतकर्‍यांना 14 कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाचे 2 हजार 750 शेतकर्‍यांना 13 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे 11 हजार 677 शेतकर्‍यांना 58 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रचे 9 हजार 482 शेतकर्‍यांना 47 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 1 हजार 488 शेतकर्‍यांना 7 कोटी, युको बँकेचे 411 शेतकर्‍यांना 4 कोटी, पंजाब नॅशनल बँकेचे 2 हजार 26 शेतकर्‍यांना 25 कोटी, कॅनरा बँकेचे 192 शेतकर्‍यांना 2 कोटी, इंडियन बँकेचे 1 हजार 430 शेतकर्‍यांना 11 कोटी रूपयांचे प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button