मसानगंजमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’!

अघोरी विद्या करणारा तांत्रिक कोण ?

लोकांमध्ये दहशत; पोलिसात तक्रार

अमरावती / 12 फेब्रुवारी : स्थानिक मसानगंज परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका अज्ञात तांत्रिकाने मांडलेल्या अघोरी कृत्यांच्या खेळामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दररोज नव्या अफवांच पेव फुटत आहे.
काही लोकांच्या घरासमोर टाकलेल्या खिळे ठोकलेल्या बाहुल्या, कापलेले लिंबू आणि रक्तासारख्या लाल रंगाचे सिंचन करून लोकांच्या मनात मृत्यूची भीती भरवली जात आहे. याच मानसिक दडपणातून एका नवविवाहित महिलेला आपला प्राण गमवावा लागल्याची धक्कादायक चर्चा आता संपूर्ण शहरात वार्‍यासारखी पसरली असून, या घटनेने प्रशासनाचेही झोप उडवली आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव हरीश केदार यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेत मसानगंजचा दौरा केला. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, जादूटोणा, करणी-बाधा किंवा मूठ मारणे या गोष्टींना विज्ञानात कोणताही आधार नाही. हा सर्व प्रकार केवळ सामान्य जनतेच्या मनातील भीतीचा फायदा घेऊन त्यांना लुटण्यासाठी किंवा परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी काही विकृत प्रवृत्तींकडून केला जात आहे. रात्रीच्या वेळी लोकांच्या घरासमोर जाऊन लिंबू, हळद, कुंकू, काळी उडीद आणि अंडी टाकणे हे केवळ मानसिक खच्चीकरण करण्याचे तंत्र आहे. ज्या तांत्रिकाने ही भितीदायक बाहुली आणि खिळे ठोकून लोकांच्या मनात धडकी भरवली आहे, त्याचा शोध घेण्यासाठी समितीने आता कंबर कसली आहे. या भामट्याला पकडून त्याची भरचौकात धिंड काढण्यात येईल, असा आक्रमक पवित्रा समितीने घेतला आहे.या प्रकरणात केवळ अंधश्रद्धाच नाही, तर गुन्हेगारी प्रवृत्तीचाही मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे. मसानगंजमधील एका महिलेच्या दुचाकीची ज्या पद्धतीने तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर तिच्या घरावर अघोरी साहित्याचा मारा करण्यात आला, त्यावरून हा एखादा सुशिक्षित गुन्हेगार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तांत्रिक-मांत्रिकांच्या या अघोरी जाळ्यात अडकून कुणीही आपले जीवन संपवू नये, असे आवाहन करतानाच हरीश केदार यांनी नागरिकांना पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार अशा कृत्यांसाठी कडक कारावासाची तरतूद असून, पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या अज्ञात नराधमाचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी समितीने लावून धरली आहे. जोपर्यंत मसानगंज भीतीमुक्त होत नाही, तोपर्यंत समितीचा लढा सुरूच राहील, असा निर्धार या विशेष बातमीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. मसानगंज विरुद्ध नागरिकांनी सामुहिक तक्रार केली असून सदर तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला देण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करून सत्य उघड करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनिसचे नागरिकांना आवाहन

अघोरी कृत्ये करून कोणाचेही नुकसान करणे शक्य नसते, हा निव्वळ भ्रम आहे. लिंबू, टाचलेले खिळे किंवा पुतळ्यामुळे कोणाचा मृत्यू होत नाही, उलट भीतीमुळे माणूस खचतो. नागरिकांनी अशा गोष्टींना घाबरून न जाता, संशयास्पद व्यक्ती दिसल्यास किंवा असा प्रकार घडल्यास त्वरित अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा. तुमची एक सतर्कता या ढोंगी तांत्रिकाचा पर्दाफाश करू शकते.

संबंधित बातम्या

Back to top button