अंजनगाव सुर्जीत खासगी शाळांची मनमानी

शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

* गट शिक्षणाधिकारी शीला आठवले यांना निवेदन

अंजनगाव सुर्जी/15 जून : तालुका व शहर येथील खासगी आणि कॉन्व्हेंट शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या व शैक्षणिक सुविधांच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना शहरप्रमुख मुन्ना इसोकार, सुधाकर फुलउंबरकर यांनी आज पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शीला आठवले यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील विविध ज्वलंत प्रश्नांवर प्रदीर्घ चर्चा केली आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍या शाळांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रत्येक शाळेला मैदान असणे बंधनकारक करावे,शालेय वाहने आणि पालकांच्या गाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी व विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता पुरेशी पार्किंग व्यवस्था उभारण्यात यावी,खासगी शाळा व कॉन्व्हेंटकडून पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवून फी रचनेत पूर्ण पारदर्शकता आणण्यात यावी शासनाच्या नियमांचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करा! असा सूचक देऊन इशारा चर्चेदरम्यान मुन्ना इसोकार यांनी स्पष्ट केले की, अनेक संस्था शासनाच्या नियमांना हरताळ फासत आहेत. शिक्षण विभागाने अशा शाळांवर नियमित देखरेख ठेवावी.तसेच जे निकष पूर्ण करत नाहीत,अशा शाळांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेनंतर गटशिक्षणाधिकारी शीला आठवले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन या गंभीर विषयांची दखल घेऊन शासनाच्या नियमांनुसार सर्व खासगी व कॉन्व्हेंट शाळांची आवश्यक तपासणी केली जाईल आणि दोषी आढळणार्‍या संस्थांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी शिक्षण क्षेत्रात शिस्त, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शिवसेनेतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचा निर्धार पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुरावजी उंबरकर,तालुका समन्वयक ज्वाला रेखाते, तालुका संघटक सुधाकर फुलंबरकर, अंकित तायडे, अडगाव शाखाप्रमुख राहुल रेखाते, शुभम बानाईत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button