आशियाड कॉलनीत बालकांना सर्वांगीण विकासावर मान्यवरांचे धडे
प्रज्ञा बाल संस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन

* संस्काराची शिदोरी देत उन्हाळी सुटी सार्थकी
अमरावती/15 जून- अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने आशियाड कॉलनी परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणेच यंदाही सलग 21 व्या वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत प्रज्ञा बाल संस्कार शिबिराचे अतिशय देखणे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्णपणे मोफत असलेल्या या शिबिरामध्ये सलग दोन महिने रोज सकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत बालकांवर उत्तम संस्कार करण्याचे काम करण्यात आले. मुलांचा आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक अशा सर्व बाजूंनी विकास व्हावा या हेतूने हे शिबिर राबविण्यात आले. या शिबिराचे संपूर्ण श्रेय रजनीताई खांजोडे, त्यांचा गायत्री परिवार आणि परिसरातील इतर महिलावर्ग तसेच पालक वर्ग यांच्या अथक परिश्रमांना जाते. त्यांच्याच सक्रिय सहभागामुळे हे शिबिर मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. या दोन महिन्यांच्या कालावधीत बालकांसाठी अनेक उपयुक्त उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने योगासने, प्राणायाम, मंत्रोच्चार, मातीचे किल्ले बनवणे, आनंद मेळावा, विविध प्रकारचे खेळ, विविध स्पर्धा आणि शैक्षणिक भेटींचा समावेश होता. शिबिराच्या सांगता प्रसंगी बालकांना ’मला बार सुवर्ण आणि हिरे’ यांच्या वतीने शैक्षणिक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी वृक्ष संवर्धन प्रतिष्ठानचे बोचरे सर, कांचनताई उल्ले तसेच कडू सर यांनी शिबिराला भेट देऊन बालकांचे कौतुक केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ठाकरे काकू, पंडित काकू, काळे काकू आणि तेजस्विनी पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परिसरातील पालकांनी या उपक्रमाचे मोठे कौतुक केले आहे.




