पाच दिवसांच्या मागणीसाठी चार दिवसांचे आंदोलन

पाच दिवसांचा आठवडा त्वरित लागू करा, राजकमल चौकात बँक कर्मचार्‍यांची जोरदार निदर्शने

मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास देशव्यापी बेमुदत संप

अमरावती /11 सप्टेंबर – आठवड्यातून पाच दिवस कामाची पद्धत त्वरित लागू करावी, जुन्या कराराचा मान राखावा आणि नफ्यावरील प्रोत्साहन भत्त्यातील दुजाभाव थांबवावा, या प्रमुख मागण्यांसाठी अमरावतीतील बँक कर्मचार्‍यांनी आज राजकमल चौकात एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली. मान्य झालेल्या मुद्द्यांवर 2 वर्षे उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने संतप्त कर्मचार्‍यांनी केंद्र सरकार आणि बँक प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला असून, मागण्या मान्य न झाल्यास ऑक्टोबरमध्ये देशव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा थेट इशारा दिला.युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या हाकेवर शहरातील राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी आज सकाळीच मोठ्या संख्येने राजकमल चौकात गोळा झाले. कर्मचार्‍यांच्या हातातील फलक आणि घोषणाबाजीने परिसर पुरता दणाणून गेला होता.
बँकेचा कारभार सुरळीत चालवण्यात कष्टकरी कर्मचार्‍यांचा मोठा वाटा असतानाही व्यवस्थापन त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने डोळेझाक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 8 मार्च 2024 रोजी झालेल्या द्विपक्षीय करारात पाच दिवसांच्या कामकाजावर पूर्ण सहमती झाली होती. तरीही 2 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटूनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.पाच दिवसांच्या कामकाजामुळे ग्राहकांची गैरसोय होईल, असा दावा बँक प्रशासनाकडून नेहमी केला जातो. मात्र त्यावर उपाय म्हणून कर्मचार्‍यांनी सोमवार ते शुक्रवार दररोज 40 मिनिटे जादा काम करण्याची तयारी आधीच दर्शवली आहे. तरीही प्रशासन निर्णय घेत नसल्याने दिरंगाईचे कारण काय, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
याशिवाय नफा आधारित प्रोत्साहन भत्त्यात मोठा भेदभाव सुरू असून, सुमारे 95 टक्के सामान्य कर्मचार्‍यांवर अन्याय करून केवळ 5 टक्के वरिष्ठ अधिकार्‍यांना 365 दिवसांच्या वेतनाइतका लाभ दिला जात असल्याचा आरोपही संघटनेने केला. बँकेच्या नफ्यात सर्वांचा घाम गाळलेला असताना हा फरक कशासाठी, असा संतप्त सवाल यावेळी विचारण्यात आला.केवळ एका दिवसाच्या आंदोलनावर न थांबता हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्णय बँक संघटनांनी घेतला आहे. त्यानुसार 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा पुढचा टप्पा राबवला जाईल. तरीही शासनाने सकारात्मक तोडगा न काढल्यास येत्या 26 ऑक्टोबर 2026 पासून देशभरातील बँकांमध्ये बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले जाईल. आजच्या या धडक आंदोलनात भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया यासह सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या अमरावती शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.बॉक्स – 26 ऑक्टोबरपासून बँक सेवा ठप्प आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून येत्या 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी बँक कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. तरीही प्रशासनाने करार पाळला नाही, तर 26 ऑक्टोबर 2026 पासून सर्व बँकांमध्ये देशव्यापी बेमुदत संप पुकारला जाईल.

Back to top button