अखेर ऐतिहासिक वास्तू मनपा व पोलीस प्रशासनाकडून अतिक्रमणमुक्त
नेहरू मैदानच्या शाळेत मनपाचे अतिक्रमण विभागाचे कार्यालय कार्यरत होणार

अमरावतीचा वारसा जपण्यासाठी प्रशासनाची पावले
नगरसेवक अनिल अग्रवाल व दिनेश बुब यांच्या प्रयत्नांना यश
अमरावती /28 मे- नेहरू मैदानातील ऐतिहासिक नानासाहेब गोखले वास्तूचे जतन आणि देखभाल करण्याबाबत महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल आणि दिनेश बूब यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. हा मुद्दा लावून धरल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. महापालिकेने केवळ वास्तूतून भटक्यांना हटवण्यास सुरुवात केली नाही, तर आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी अतिक्रमण विभागाचे कार्यालय याच वास्तूत सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. नेहरू मैदानाची दोन्ही बाजू म्हणजे जयस्तंभ आणि राजापेठ चौकाच्या बाजूने भव्य प्रवेशद्वार व कुलूप असलेले दरवाजे बसवले जाणार आहेत. येथे तयार झालेली अनधिकृत वाहन पार्किंगची जागा देखील हटवली जाणार आहे. महापालिका या वास्तूवर संपूर्ण लक्ष देऊन तिची देखभाल करणार आहे. मंगळवार 26 मे रोजी रात्री बाराच्या सुमारास महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि सिटी कोतवाली पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राजकमल चौकातील ऐतिहासिक नेहरू मैदानातील शाळेत भटक्यांनी केलेल्या ताबा नंतर ही कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे तमाम भटके तिथून पळून गेले, तर काही भटक्यांना अतिक्रमण दलाने बाहेर काढले. नेहरू मैदान परिसरात आणि येथील ऐतिहासिक शाळेत भटक्यांनी गेल्या काही वर्षांपासून अवैधपणे ताबा केला होता. याकडे प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. भटक्यांनी नेहरू मैदानातील शाळेत आणि परिसरात ताबा केल्यामुळे तिथे पूर्णतः अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकदा या संदर्भात स्थानिक व्यापार्यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई होत नव्हती. एवढेच नाही, तर भटक्यांनी नेहरू मैदानातील या ऐतिहासिक शाळेच्या वर्गातील कपाटे, लोखंडी साहित्य आणि फर्निचरपर्यंत चोरून नेले होते. याचा सचित्र वृत्तांत ’अमरावती मातृभूमी’ने प्रमुखतेने प्रकाशित केला. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल आणि दिनेश बूब यांनी महापालिका प्रशासनाकडे सदर वास्तूच्या जतनाची अपील केली. त्यांच्या अपिलाची आणि ’आपली मातृभूमी’च्या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी निर्देश जारी केले. त्यांच्या निर्देशावरून पोलिसांनी चोख बंदोबस्त लावून महापालिका प्रशासनासह अचानक अभियान छेडले असता, सुमारे 250 पेक्षा अधिक भटके तिथून पळून गेले. अतिक्रमण विभागाने सुमारे 4 ट्रक भरून भटक्यांचे साहित्य जप्त केले आहे. नेहरू मैदानातून पळून जाताच पोलीस प्रशासनाने सर्व भटक्यांना वाटेतच ताब्यात घेतले आणि कडेकोट बंदोबस्तात राजुरा बेडा परिसरात सोडून दिले. या कारवाईमुळे भटक्यांमध्ये खळबळ उडाली होती. ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश कोल्हे यांच्या नेतृत्वात आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील 20 पेक्षा अधिक पोलीस कर्मचार्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. महापालिका प्रशासनाने नेहरू मैदानातील ऐतिहासिक शाळेची पुन्हा दुरुस्ती करण्याचा विचार केला आहे. त्या ठिकाणी स्थानिक हमालपुरा येथील अतिक्रमण कार्यालय स्थानांतरित करण्याचा प्राथमिक निर्णय प्रशासनाकडून घेतला जात आहे. नेहरू मैदानातील दोन्ही बाजूंना एक भव्य-दिव्य प्रवेशद्वार बनवून, तेथील बांधकाम पूर्ण होईपर्यंत 24 तास पोलीस बंदोबस्त लावण्याची कारवाई महापालिका प्रशासनाकडून केली जात आहे. महापालिकेद्वारे अखेर नेहरू मैदानाकडे लक्ष दिले गेल्यामुळे अमरावतीकरांनी हर्ष व्यक्त केला आहे. तथापि, आता महापालिकेद्वारे पूर्णतः तिथे सर्व इमारत आणि परिसर आपल्या ताब्यात घेऊन कारवाई केली जाण्याची अमरावतीचे लोक प्रतीक्षा आणि अपेक्षा व्यक्त करत आहेत.




