पुन्हा ड्रग्स सापडले
डीआरआयची मोठी कारवाई, एमपीचा ‘भुर्या’ गजाआड

अमरावती / 18 फेब्रुवारी : शहराच्या शांततेत ’एमडी’ ड्रग्जचा शिरकाव करण्याचा तस्करांचा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उधळून लावला आहे. तब्बल 7 कोटी 50 लाख रुपये किमतीचे 4 किलो 904 ग्रॅम अमली पदार्थ जप्त केल्यानंतर, आता या तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरू लागली आहेत. मंगळवारी भरदुपारी डीआरआयच्या पथकाने अमरावतीच्या रिंग रोडवर थरारक ’सीन रिक्रिएशन’ करत गुन्ह्याचा पंचनामा केला. यावेळी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतलेल्या ’भुर्या’ नावाच्या संशयित आरोपीला सोबत आणून पथकाने या काळ्या व्यवसायाचे कच्चे चिठ्ठे उघड केले आहेत. अमरावती शहरात 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या या धडक कारवाईने संपूर्ण विदर्भातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईहून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या पथकाने सापळा रचला होता. मध्य प्रदेशातून एका खासगी कारमधून हे साडेसात कोटींचे ’पांढरे विष’ अमरावतीत आणण्यात आले होते. येथून हे ड्रग्ज थेट अहमदाबादला पोहोचवण्याची तस्करांची मोठी योजना होती. मात्र, पोलिसांनी वेळीच झडप घालून या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात आवेज अहमद आरिफ अहमद (चांदूर बाजार), फैजल खान अंसारी खान (गुलिस्ता नगर), मुस्तकीम खान अब्दुल ताहीर खान (चांदूर बाजार) आणि शेख परवेज शेख नजीर (चांदनी चौक) या चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
मंगळवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास डीआरआयचे पथक एका संशयित आरोपीसह रिंग रोडवरील राजपूत ढाब्याजवळ पोहोचले. यावेळी संशयास्पद हालचाली आणि ड्रग्जचा व्यवहार ज्या ठिकाणी झाला, त्या जागेची बारकाईने पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे, पथकातील काही अधिकारी वाहनात बसून संशयिताची कसून चौकशी करत होते, तर काही कर्मचारी बाहेर प्रत्यक्ष पंचनामा करत होते. हे संपूर्ण नाट्य तब्बल दीड तास सुरू होते आणि या सर्व प्रक्रियेचे ’इन-कॅमेरा’ चित्रीकरण करण्यात आले.
या प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडी 16 फेब्रुवारी रोजी संपली होती. मात्र, डीआरआयने त्यांना न्यायालयात सादर न केल्यामुळे न्यायालयाने आता ही कोठडी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवून दिली आहे. यामुळे या प्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढणार असून, ड्रग्ज रॅकेटमधील ’मोठे मासे’ लवकरच जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास पूर्ण करून डीआरआयचे पथक पुन्हा नागपूरकडे रवाना झाले आहे.
मोठे रॅकेट उघड होणार?
साडेसात कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त डीआरआयच्या पथकाने या मोहिमेत एकूण 4 किलो 904 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. अमरावतीच्या गुन्हेगारी इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, मध्य प्रदेशातून आलेल्या ’भुर्या’ नावाच्या व्यक्तीकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. हे ड्रग्ज रॅकेट आंतरराज्यीय स्तरावर पसरले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.




