महावितरणचे स्मार्ट वीजमीटर पारदर्शक व ग्राहकांच्या आर्थिक बचतीचे

संचालक राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

अमरावती /18 फेब्रुवारी : बदलत्या तंत्रज्ञानावर आधारित असलेले महावितरणचे स्मार्ट मीटर हे वीज ग्राहकांसाठी अत्यंत फायद्याचे आहे. या मीटरमुळे, ग्राहकांना मिळणार्‍या विविध सुविधांची आणि आर्थिक लाभांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवा. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनात काही गैरसमज असतील तर ते प्रत्यक्ष भेटीतून आणि प्रात्यक्षिकातून दूर करा, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले.
महावितरण कंपनीच्या वतीने बडनेरा बस स्थानकाजवळ आयोजित ’स्मार्ट मीटर जनजागृती’ स्टॉलचे उद्घाटक म्हणून संचालक श्री. पवार बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता दिपक देवहाते, दीपाली माडेलवार, कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे, उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे उपस्थित होते. दि. 9 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत राबविल्या जाणार्‍या जनजागृती पंधरवड्यानिमित्त या विशेष माहिती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याप्रसंगी मार्गदर्शन करताना राजेंद्र पवार यांनी स्मार्ट मीटरच्या तांत्रिक अचूकतेवर विशेष भर दिला. ते म्हणाले की, स्मार्ट मीटरच्या दरमहा रिडिंगमध्ये मानवी हस्तक्षेप नाही. स्वयंचलित पद्धतीने मीटरचे वाचन होते. त्यामुळे ग्राहकांना शंभर टक्के अचूक आणि वेळेवर वीज बिल मिळणे आता शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी प्रति युनिट 80 पैशांची ’टाइम ऑफ डे’ (ढेऊ) सवलत जुलै 2025 पासून लागू करण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा घेतल्यास ग्राहकांच्या मासिक बिलात मोठी बचत होत आहे. याशिवाय, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या दर तासाचा वीज वापर मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे स्वतःच्या वीज वापरावर नियंत्रण ठेवणे आणि त्याचे योग्य नियोजन करणे ग्राहकांना सहज शक्य झाले आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल जास्त येते हा ग्राहकांचा समज पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट करत संचालक श्री. पवार यांनी सांगितले की, हे मीटर केवळ वापरलेल्या विजेचे अचूक मोजमाप करते. या मीटरसाठी महावितरण कोणत्याही प्रकारचे शुल्क ग्राहकांकडून आकारत नाही, ही बाब ग्राहकांना प्रकर्षाने सांगावी. हे मीटर बसवणे सर्वच ग्राहकांसाठी अनिवार्य असून, त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करणे ही काळाची गरज आहे, असे संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी सांगीतले.

संबंधित बातम्या

Back to top button