डॉ.सुनील देशमुख पोलीस आयुक्तांना भेटले, 46 डिग्रीच्या कडक उन्हात राकेश ओला रस्त्यावर उतरल
पोलीस आयुक्तांकडे शिष्टमंडळाची तक्रार

शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत
पोलिस अधिकार्यांचा एसी कॅबिनमधूनच कारभार
रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे नागरिक, व्यापार्यांना त्रास
शष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी
अमरावती/19 मे- शहरातील विस्कळीत आणि कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी आज पोलीस आयुक्त राकेश ओला यांची भेट घेतली. शहरातील मुख्य बाजारपेठ, प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये रोज लागणार्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे व्यापारी वर्ग आणि सामान्य जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या कोंडीमुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत असून, व्यापार्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आणि वाहनचालकांमध्ये वादविवादीचे प्रमाण वाढले आहे. या सर्व बाबींचा सविस्तर गोषवारा असलेले सविस्तर निवेदन डॉ. देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना सादर केले. यावेळी त्यांच्यासोबत महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी, पीडीएमएमसीचे डीन डॉ. ए. टी. देशमुख, डॉ. बबन बेलसरे, संपादक विलास मराठे, अॅड. के. एच. देशपांडे आणि डॉ. अजय डफळे यांच्यासह अनेक प्रमुख व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.
शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढली असली, तरी वाहतूक नियोजनासाठी अजूनही जुन्याच पद्धतीचाच वापर केला जात असल्याचा आरोप डॉ. सुनील देशमुख यांनी केला. विविध शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या मुख्य चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची अत्यंत गरज आहे, तिथे एकही पोलीस कर्मचारी दिसत नाही. याउलट, वाहतूक पोलीस दोन-तीन जणांचे गट करून एखाद्या निर्जन किंवा शांत रस्त्यावर उभे राहतात आणि प्रामाणिकपणे वाहन चालवणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करतात. वाहतूक पोलिसांची ही कार्यपद्धती सामान्य नागरिकांच्या बुद्धीच्या पलिकडे आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांच्या धर्तीवर अमरावतीमध्येही केवळ वाहतुकीचे नियमन करणारे समर्पित पोलीस कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे, मात्र सध्या शहरात अशा कर्मचार्यांची मोठी वानवा आहे. गर्दीच्या चौकात पोलीस नसतात आणि जिथे गरज नाही तिथे दंडाची भीती दाखवून वसुली केली जाते, असा थेट आरोप व्यापार्यांनी केला आहे. या संपूर्ण दुरवस्थेला वाहतूक शाखेचे अधिकारीही तितकेच जबाबदार असून, निरीक्षकआणि सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी कधीही रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करत नाहीत. हे अधिकारी केवळ आपल्या वातानुकूलित कक्षात बसून राहणे पसंत करतात. आता अधिकार्यांनी कार्यालयातून बाहेर पडून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, शहरात हॉकर्स आणि अतिक्रमणधारकांनी रस्ते व पदपथ पूर्णपणे काबीज केले आहेत. कठोरा नाका, शेगाव नाका, गाडगे नगर, पंचवटी चौक, जयस्तंभ चौक, अंबादेवी रस्ता, इतवारा, गांधी चौक, प्रभात चौक, जवाहर रस्ता, सरोज चौक, राजापेठ आणि नवाथे चौक या सर्व प्रमुख भागांमध्ये हॉकर्सचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. या गंभीर परिस्थितीमुळे अमरावतीमधील दुचाकी चालक रोज आपला जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी परतेल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. यावर पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी संपूर्ण परिस्थिती समजून घेत, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि नूतन नियोजनासाठी तातडीने आणि कालबद्ध उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
अमरावतीकर रोज मरणाच्या दारात-शहरातल्या बेजबाबदार आणि कोलमडलेल्या वाहतुकीमुळं अमरावतीची जनता पार हैराण झालीय. रोज सकाळी कामावर जाणारा माणूस संध्याकाळी सुखरूप घरी येईल का, याची शाश्वती राहिलेली नाही. रस्ते जणू मृत्यूचे सापळे बनलेत. व्यापार्यांनी आणि नागरिकांनी आता या जाचातून मुक्ततेसाठी थेट पोलीस प्रशासनाला जाब विचारलाय. अमरावतीची विस्कळीत वाहतूक आणि नागरिकांचे हाल यावर माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त राकेश ओला यांची भेट घेऊन थेट समस्येवर बोट ठेवले. या संवेदनशील भेटीनंतर पोलीस आयुक्तांनी तात्काळ 45 अंश सेल्सिअसच्या कडक उन्हात स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पावले उचलली. लोकप्रतिनिधींच्या जागरूकतेमुळे प्रशासनाला जनतेसाठी रस्त्यावर उतरावे लागल्याचा हा सकारात्मक बदल सध्या अमरावतीकरांच्या पसंतीस उतरला आहे.




