अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत आ.बच्चू कडूंचा वाढला दबदबा
दयाराम काळे आ.कडूंच्या गटात

सहकारी बँकेत आता कडू गट अधिक मजबूत
अमरावती /5 जून- शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी लढा देणारे आ. बच्चू कडू यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील वर्चस्व अधिकच प्रस्थापित झाले आहे.
बँकेचे संचालक दयाराम काळे यांनी कडूंच्या गटात प्रवेश केल्याने संचालक मंडळातील कडू समर्थकांची संख्या आता अकरावर पोहोचली असून, यामुळे बँकेतील सत्ताकेंद्र कडूंच्या बाजूने झुकले आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शेतकर्यांच्या हितासाठी निर्णय घेताना आ. बच्चू कडू यांना मागील तीन वर्षांपासून विविध अडचणींचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. मागील निवडणुकीत काँग्रेस समर्थित संचालकांना आपल्याकडे वळवून त्यांनी अध्यक्षपद मिळवले होते. त्यानंतरही बँकेच्या प्रत्येक बैठकीत त्यांना जोरदार विरोधाचा सामना करावा लागला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि त्यांच्या गटातील संचालकांनी अनेकदा बैठकांमध्ये विरोध दर्शवला, तरीही आ. बच्चू कडू यांनी शेतकरी हिताचे निर्णय धडाकेबाजपणे मार्गी लावले. आता दयाराम काळे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या पाठिंब्यामुळे कडूंचे पारडे जड झाले आहे. बँकेच्या 21 सदस्यांच्या संचालक मंडळात एका सदस्याची सदस्यता निलंबित झाल्यामुळे आता 20 सदस्य संख्या उरली आहे. यात अकरा सदस्य कडूंच्या पाठीशी असल्याने बहुमताचा आकडा सहज पार झाला आहे. बँकेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये याआधी अडथळे आणले जात होते, मात्र आता बहुमत मिळाल्यामुळे विकासकामांना गती मिळणार आहे. राज्याने कर्जमाफी जाहीर केली असून, याचा थेट लाभ जिल्ह्यातील अडीच लाख शेतकर्यांना होणार आहे. या कर्जमाफीसाठी आ. बच्चू कडू यांनी नागपूर विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मोठा लढा दिला होता, त्यामुळे बँकेच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सहा हजार कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या या बँकेच्या 95 शाखा असून 35 हजार सभासद जोडले गेले आहेत. ठेवीदारांचा विश्वास आणि शेतकर्यांसाठी राबवल्या जाणार्या विविध योजनांमुळे बँकेची प्रगती सुरू आहे. आता नव्याने मिळालेल्या बहुमतामुळे बँकेच्या कामकाजात होणारे अडथळे दूर होऊन शेतकरी हिताचे निर्णय अधिक वेगाने अमलात येतील, असे चित्र स्पष्ट होत आहे.
शेतकर्यांचा नाथ आता सत्तेच्या शिखरावर
बँकेतील कडू यांचे वर्चस्व हे केवळ राजकीय नसून ते शेतकरी हिताचा विजय मानला जात आहे. ज्या प्रकारे त्यांनी कर्जमाफीसाठी रस्त्यावरची लढाई जिंकली, तशीच कामगिरी आता बँकेच्या व्यवस्थापनात करत आहेत. कडूंच्या नेतृत्वाखाली आता बँकेचा कारभार अधिक पारदर्शकपणे आणि गतीने चालणार असून, यामुळे सामान्य शेतकर्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हे बदल नक्कीच सहकार क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणतील.




