गोंड वाघोलीच्या तलावात वृद्धेचा मृतदेह आढळला
शौचास गेलेल्या 70 वर्षीय आजीचा अंत

* पथ्रोट पोलिसांकडून घटनेचा कसून तपास सुरू
पथ्रोट / 22 मार्च : निसर्गविधीसाठी गेलेल्या एका 70 वर्षीय वृद्धेचा तलावात बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अचलपूर तालुक्यातील गोंड वाघोली येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, घातपाताची शक्यता की अपघाती मृत्यू, अशा चर्चांना उधाण आले आहे. भागीरथी बन्सी बेठे असे मृत महिलेचे नाव असून, ऐन दुपारी ही घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भागीरथी बेठे या गावाशेजारीच असलेल्या तलावाच्या दिशेने नैसर्गिक विधीसाठी गेल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नातेवाइकांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली असता, काठावर त्यांच्या चपला पडलेल्या अवस्थेत आढळल्या. काळजाचा ठोका चुकलेल्या कुटुंबीयांनी पाण्यात शोध घेतला असता, भागीरथी यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती वार्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी तलावाकाठी मोठी गर्दी केली होती.घटनेचे गांभीर्य ओळखून पथ्रोट पोलीस ठाण्याचे ठाणेदार चौथनकर, बीट जमादार शिंपी व पोलीस कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला आणि उत्तरीय तपासणीसाठी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. वृद्धेचा पाय घसरून ती पाण्यात पडली की यामागे अन्य काही कारण आहे, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. ठाणेदार चौथनकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शिंपी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेने बेठे कुटुंबावर शोककळा पसरली असून, पथ्रोट पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
तलावाकाठी चपला अन् पांढरं पडलेलं शरीर!-भागीरथी बेठे या नेहमीप्रमाणे तलावाकडे गेल्या होत्या, मात्र काठावर पडलेल्या त्यांच्या चपलांनीच घातपाताचा किंवा अपघाताचा संकेत दिला. पाण्याबाहेर काढलेला त्यांचा निपचित देह पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. भरदिवसा घडलेल्या या घटनेने ग्रामीण भागात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




