वर्ध्यानंतर पुन्हा एक नवजात बालक अमरावतीतून ताब्यात

डॉ.भोजने दाम्पत्यांच्या नवजात बाळांच्या विक्री प्रकरणाचा मोठा पर्दाफाश

पालकांच्या संमतीने सहा बाळांचा व्यवहार उघड
दोन महिला आरोपींच्या अटकेने धागे रुग्णालयापर्यंत
डॉ. वैशाली भोजने दाम्पत्याची पोलीस कोठडी आज संपणार
7 आरोपींना अटक; अल्पवयीनसह 11 आरोपींचा समावेश

अमरावती/19 नोव्हेंबर – फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुरुवारी अमरावती जिल्ह्यातून आणखी एक बाळ ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत एकूण 8 बाळांची देवाणघेवाण झाल्याची माहिती तपासात समोर आली असून यापैकी 3 बालक पोलिसांच्या हाती लागली आहेत. कायदेशीर प्रक्रिया न करता पालकांच्या संमतीने 6 बाळांचा व्यवहार झाल्याची कबुली मुख्य आरोपी डॉ. वैशाली भोजने यांनी दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन बालकासह एकूण 11 जणांची नावे समोर आली आहेत.
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेची कलमे 143(3), 143(4), 369(2), 3(5) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4, 6 व 21 अंतर्गत गुन्हा क्रमांक 128/2026 नोंदवण्यात आला आहे. बाळांना कोणत्या परिस्थितीत दुसर्‍या कुटुंबाकडे सोपवण्यात आले आणि हे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा कसून तपास सध्या सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात बुटी प्लॉट येथील भोजने प्रसूती रुग्णालयातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
या प्रकरणात बुटी प्लॉट, राजापेठ येथील रहिवासी डॉ. वैशाली प्रफुल्ल भोजने (49) आणि प्रफुल्ल वसंतराव भोजने (56) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यांना सुरुवातीला 16 नोव्हेंबरपर्यंत आणि नंतर 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती, जी आज संपत आहे. कोठडीत केलेल्या चौकशीत डॉ. वैशाली भोजने यांनी 6 बाळांच्या व्यवहाराची माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 16 ऑक्टोबरला 1 बाळ, 18 नोव्हेंबरला वर्धा जिल्ह्यातून 1 बाळ आणि 19 नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्यातून 1 बाळ अशी एकूण 3 बालक ताब्यात घेतली आहेत.वाड्यावस्त्यांवर व दवाखान्यात जाऊन समुपदेशन करणारी राजुरा येथील मेरी उर्फ प्रतिभा संजय नगराळे (45) आणि डफरीन रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी संगीता अशोक गवळी (46) या दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे. संगीता गवळी यांना 17 नोव्हेंबरला अटक झाली असून न्यायालयाने त्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.बुधवारी अटक झालेले निर्मल सरदार यांच्यासह वर्धा येथून ताब्यात घेतलेल्या बाळाच्या कथित शेतकरी आईवडिलांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. या दाम्पत्याने सुमारे वर्षभरापूर्वी 3 लाख 40 हजार रुपयांना हे बालक विकत घेतल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणात डॉ. वैशाली प्रफुल्ल भोजने, प्रफुल्ल वसंतराव भोजने, मयूर धांडे, निर्मल सरदार, मेरी उर्फ प्रतिभा संजय नगराळे, संगीता अशोक गवळी, वर्धा व अमरावती येथील पालक आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी 11 नावे निष्पन्न झाली आहेत. ताब्यात घेतलेल्या 7 आरोपींची वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कसून चौकशी सुरू आहे. तसेच मध्यस्थी केल्याच्या संशयावरून आणखी 3 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासात आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

भोजने दाम्पत्याची 16 एकर बाग रडारवर
पोलीस तपासात मुख्य आरोपी भोजने दाम्पत्याकडे 16 एकर संत्रा बाग असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय शहरात व परिसरात त्यांची मोठी मालमत्ता असल्याची चर्चा रंगली आहे. इतकी मोठी मालमत्ता नेमकी कुठून आली, असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. त्यामुळे या संपूर्ण संपत्तीची आणि पैशांच्या व्यवहारांची सखोल चौकशी केली जाणार आहे.

12 मोबाईल नंबर मधून प्रकरणाची चौकशी
तपास पथकाला मोबाईलमधून 12 जणांचे संपर्क क्रमांक मिळाले असून त्याआधारे इतर आरोपींची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. उर्वरित 5 बाळांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत. कुणालाही संशय येऊ नये म्हणून बाजारात काम करणार्‍या व साधी नोकरी करणार्‍या सामान्य लोकांना पुढे करून हा व्यवहार केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Back to top button