विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबध्द-जिल्हाधिकारी येरेकर
महापालिका शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप

अमरावती /30 जून– चपराशीपुरा येथील महानगरपालिका शाळा क्रमांक 13 (मराठी) आणि मनपा शाळा क्रमांक 6 (उर्दू) मध्ये विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक तसेच अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, मनपा शिक्षण अधिकारी प्रशांत मेश्राम, शिक्षक, पालक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाला संबोधित करताना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दोन्ही शाळांच्या विकासकामांचे कौतुक केले. ते म्हणाले की, या मनपा शाळा स्वच्छ, सुंदर, सुसज्ज आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण देणार्या आदर्श शाळा आहेत. त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक, पालक आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून भविष्यातही असेच प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले. या प्रसंगी बबलू शेखावत यांनी सांगितले की, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य हीच आपली सर्वात मोठी प्राथमिकता आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी दोन्ही शाळांची स्थिती अत्यंत खराब होती, विद्यार्थ्यांची संख्या घटत होती आणि मूलभूत सुविधांचा अभाव होता. बबलू शेखावत यांनी भविष्यात येथे नवीन आधुनिक इमारत बांधण्याचा संकल्पही बोलून दाखवला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरील आनंद आणि पालकांच्या समाधानाने या उपक्रमाचे यश सिद्ध केले.




