अमरावती आमझरी-चिखलदरा ’राजमाता जिजाऊ’ बस सेवा सुरू करा

चिखलदरा स्फुर्ती क्लस्टरची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

अमरावती/22 मे– मागील पाच वर्षांपासून अमरावती ते चिखलदरा थेट सरकारी बस सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने स्थानिक मेळघाटातील आदिवासी बांधव, छोटे व्यावसायिक आणि पर्यटकांना अतोनात मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा वेध घेत चिखलदरा स्फूर्ती क्लस्टर शहापूरचे संचालक सुनील भालेराव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना एक आग्रही निवेदन सादर करण्यात आले. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथील पर्यटन व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी अमरावती ते चिखलदरा मार्गे ’मधाचे गाव’ आमझरी या मार्गावर दररोज किमान दोन विजेवर चालणार्‍या (इलेक्ट्रिक) आणि एक साधी ’राजमाता जिजाऊ’ बस सेवा त्वरित सुरू करावी, अशी मुख्य मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या अमरावती या मुख्य विभागीय मुख्यालयातून चिखलदर्‍यासाठी एकही थेट सरकारी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. सध्याच्या स्थितीत केवळ यवतमाळवरून सायंकाळी पाच वाजता येणार्‍या एकाच गाडीवर सर्वांना अवलंबून राहावे लागते. परिणामी, गरीब आदिवासी आणि पर्यटकांना खासगी वाहनांचा महागडा आसरा घ्यावा लागतो, जो अत्यंत खर्चिक आणि सामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही. या अवाजवी खर्चामुळे चिखलदर्‍याच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला असून पर्यटकांची संख्या रोडावली आहे.
या लोकचळवळीची गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक खासदार बळवंत वानखेडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना स्वतंत्र शिफारस पत्र पाठवून ही बस सेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निवेदनावर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपीलाल धिकार, नंदनवन शहर उपजीविका केंद्र चिखलदरा अंतर्गत येणार्‍या महिला बचतगटांच्या सर्व सदस्य आणि पदाधिकार्‍यांनी स्वाक्षर्‍या करून ही मागणी लावून धरली आहे. आता या सर्वपक्षीय आणि सामूहिक पाठपुराव्यानंतर सुस्त प्रशासन जागे होऊन पावसाळ्यापूर्वी ही हक्काची लालपरी सुरू करणार का, याकडे संपूर्ण चिखलदरावासीयांचे डोळे लागले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button