सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह उंडाळकर
तर दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी बिनविरोध, जिल्हा परिषदेच्या पराभवाचा वचपा

सातारा/18 नोव्हेंबर: सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील पराभवाचा बदला घेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या विजयामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने अवघ्या एका मताने सत्ता स्थापन केली होती. या निवडणुकीदरम्यान शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांना व सदस्यांना रोखण्यात आले होते, ज्यावरून मोठा गोंधळ झाला होता. या अपमानाचा आणि पराभवाचा वचपा काढण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी कंबर कसली होती. त्यांनी भाजपचे नेते मंत्री जयकुमार गोरे यांना जोरदार शह देत नवी राजकीय समीकरणे जुळवली. बुधवारी सकाळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी भाजपच्या संचालकांची बैठक झाली, तर दुसरीकडे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रणनीती आखली. ठरलेल्या व्यूहरचनेनुसार राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अध्यक्षपदासाठी, तर शिवसेनेचे दीपक चव्हाण यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.





