नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित
25 नोव्हेंबरपासून सुनावणी

नवी दिल्ली/18 नोव्हेंबर- नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित खटल्यात दिल्लीच्या एका न्यायालयाने मोठा निर्णय दिला. न्यायालयाने या प्रकरणातील 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी सर्व आरोपींना न्यायालयात औपचारिकपणे हजर राहण्याचे निर्देश दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरपासून डे-टू-डे घेतली जाणार आहे.
या प्रकरणात सीबीआयने सुमारे 20,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, त्यात 14 जणांना आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले. या आरोपींमध्ये यश यादव, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, प्रल्हाद कुलकर्णी, तेजस हर्षद कुमार, डॉ. मनोज शिरुरे, शिवराज रघुनाथ मोटेगांवकर, मनीषा वाघमारे, मनीषा मंधारे, मनीषा हवलदार आणि शेषराव सूर्यवंशी यांचा समावेश आहे. त्यांच्यावर आपराधिक षड्यंत्र, फसवणूक, आपराधिक विश्वासघात, पुरावे नष्ट करणे आणि ’भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा’ तसेच ’सार्वजनिक परीक्षा कायदा, 2024’च्या तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले आहे की, तीन विषय तज्ज्ञांनी दिल्लीतील ’नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ कार्यालयातून विविध मार्गांनी नीट परीक्षेचे प्रश्न लीक केले. आरोपी कार्यालयाच्या गोपनीय विभागातून बाहेर पडताना त्यांची कसून तपासणी केली जात नसे, ज्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयने 12 मे रोजी या प्रकरणाची नोंद केली आणि 13 मे रोजी पहिली अटक केली. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणापर्यंत पोहोचला. सीबीआयने दोन आरोपपत्रांत मिळून 14 जणांना आरोपी केले आहे. 28 जुलै रोजी दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात 13 जणांचा समावेश होता, तर 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील चहा विक्रेता शेषराव बजरंग सूर्यवंशी याच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.





