मराठवाड्यातील एकमेव जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव

पटेल म्हणाले, पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज

मुंबई/28 ऑक्टोबर – मागच्या पुणे पदवीधरच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदाच्या महायुतीच्या जागा वाटपात भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुणे पदवीधरची जागेवर आपला उमेदवार उभा केला. अशा परिस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला एकमेव उमेदवार उभा केला.
मात्र पुण्याची जागा गमावल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला छत्रपती संभाजीनगरमधील एकमेव जागेवर देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रफुल पटेल यांनी द या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, आजचे विधान परिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहे. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने आणि कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल, असा सल्ला प्रफुल पटेल यांनी दिला. मात्र त्यांचा रोख उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याकडे असल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हक्काचा गड मानला जात असतानाही महायुतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटला. तर दुसरीकडे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीतील पाच जागांपैकी फक्त एका जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक लढवली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तीन टर्मचे आमदार सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. मात्र गेल्या 18 वर्षांपासून म्हणजेच सलग तीन टर्म या मतदारसंघावर वर्चस्व राखणार्‍या सतीश चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सतीश चव्हाण यांना पराभूत केले आहे. विशेष म्हणजे सतीष चव्हाण यांच्याविरोधात रीलस्टार रविराज साबळे यांनी जवळपास 20 हजार मतं खेचली. त्यामुळे प्रफुल पटेल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Back to top button