विवाह जुळवणीसाठी शेगावात राज्यस्तरीय मेळावा
10 नोव्हेंबरला वधू-वर परिचय सोहळा, ‘सोयरीक’ पुस्तकाचे प्रकाशन, पालकांनाही सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती /28 ऑक्टोबर – विवाहेच्छुक युवक-युवतींना योग्य जोडीदार शोधण्यासाठी मदत व्हावी आणि पालकांची स्थळ शोधण्याची धावपळ कमी व्हावी, यासाठी शिव संभाजी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे 10 नोव्हेंबरला राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेगाव नाका परिसरातील अभियंता भवन येथे होणार्या या मेळाव्यात ‘सोयरीक’ पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश उभाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विदर्भातील कुणबी, मराठा आणि पाटील समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात योग्य स्थळ शोधणे, कुटुंबांची माहिती मिळवणे आणि विवाहाबाबत परस्पर संवाद साधणे ही प्रक्रिया अनेकदा कठीण होते. त्यामुळे अशा मेळाव्यांची गरज वाढत असल्याचे उभाड यांनी सांगितले. शिव संभाजी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे 2021 पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजातील युवक-युवतींना एकत्र आणणे, कुटुंबांमध्ये संवाद वाढवणे, पारंपरिक पद्धतीने विवाह जुळवणीला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. अधिकाधिक कुटुंबांनी मेळाव्यात सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नीलेश उभाड यांनी केले.





