शिवसेनेचे किरण सरनाईकांची बाजी

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून

काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव

बंडखोर श्रीकांत देशपांडे तिसर्‍या क्रमांकावर

महायुतीच्या नेत्यांचा विजयी जल्लोष

अमरावती/28 ऑक्टोबर  : महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणूकीत अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार सरनाईक किरण रामराव 16 हजार 663 मते मिळवून विजयी झाले. त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या अदिती ऋषिकेश पोहरे यांना 8 हजार 636 मते मिळाली.या निवडणुकीसाठी शुक्रवार 23 ऑक्टोबर रोजी विभागातील 5 जिल्ह्यातील 81 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती. 35 हजार 810 मतदारांपैकी 92.25 टक्के म्हणजे 33 हजार 34 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
अमरावती येथील ’लोकशाही भवन’ या इमारतीत मंगळवार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रीयेस प्रारंभ झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे , निवडणूक निरीक्षक अभय महाजन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर (अमरावती), वर्षा मीना (अकोला), योगेश कुंभेजकर (वाशिम), विकास मीना (यवतमाळ), प्रविणकुमार देवरे (बुलढाणा) तसेच इतर नियुक्त अधिकारी व कर्मचारी तसेच उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात उपस्थित होते.
प्रारंभी उमेदवारांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी एकुण तीन फेर्‍यात करण्यात आली. 14-14 हजार आणि शेवटी 5 हजार 34 याप्रमाणे मतपत्रिकांची तीन फेर्‍यांमध्ये यावेळी मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत तिन्ही फेरीमध्ये शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक हे कायम आघाडीवर होते. त्यांना पहिल्या पसंतीची एकुण 8 हजार 162 मते प्राप्त झाली. त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांना 4 हजार 688 मते मिळाली. दोन फेरीत दुसर्‍या क्रमांकावर असलेले अपक्ष श्रीकांत देशपांडे यांची तिसर्‍या फेरीअखेर तिसर्‍या स्थानी घसरण झाली व त्यांना 4 हजार 668 मते मिळाली.
पहिल्या पसंतीच्या मतमोजणीच्या तिसर्‍या फेरीअखेर एकूण 33 हजार 34 मतांची मोजणी करण्यात आली. एकूण 32 हजार 266 मते वैध तर 768 मते अवैध ठरली. विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा हा 16 हजार 134 मते इतका ठरला. विजयासाठी आवश्यक मते (कोटा) पहिल्या पसंतीच्या मतमोजणीनंतर एकही उमेदवार पूर्ण करू शकला नसल्याने दुसर्‍या पसंतीक्रमाच्या मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.तिसर्‍या आणि अंतिम फेरीअखेर पहिल्या पसंतीची प्रमुख दहा उमेदवारांना मिळालेली मते अशी आहेत. शिवसेनेचे किरण सरनाईकयांना 8162, काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना 4688, अपक्ष डॉ. श्रीकांत देशपांडे यांना 4668, अपक्ष सुरेश देवकर यांना 3236, अपक्ष दिलीप कडू यांना 2674, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने यांना 2155, अपक्ष डॉ. सौ.संगीता शिंदे यांना 1964, अपक्ष चंद्रशेखर भोयर यांना 1375, अपक्ष डॉ. प्रशांत विघे यांना 1267 तर अपक्ष डॉ.अविनाश बोर्डे यांना 1026 मते प्राप्त झाली.
विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवनात मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. मतपत्रिकांचे 25-25 च्या गठ्ठ्यांमध्ये वर्गीकरण केल्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास 24 टेबलवर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या पसंतीक्रमाच्या तीन फेरीतील 33 हजार 34 मतपत्रिकांची मोजणी पूर्ण होण्यासाठी सुमारे साडेदहा तासांचा अवधी लागला. पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांनंतर विजयासाठी आवश्यक असलेला निश्चित कोटा पूर्ण न झाल्याने दुसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू करावी लागली. विजयाच्या अंतिम निकालासाठी दुसर्‍या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी तब्बल 33 तास म्हणजे दुसर्‍या दिवशी बुधवार 28 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 5 वाजेपर्यंत चालली त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट झाले.अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने दुसर्‍या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी करून 26 पैकी 24 उमेदवारांना बाद फेरीत बाद करीत त्या-त्या उमेदवाराला मते वर्ग करण्यात आली. त्यामुळे निवडणूक निकाल अधिक शिगेला पोहोचला.
शिवसेनेचे विजयी उमेदवार सरनाईक किरण रामराव यांना भारत निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूकीत विजयी झाल्याचे घोषित करून यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे आणि निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांनी त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.
बाद फेरीअखेर दुसर्‍या पसंतीची इतरांची मते समाविष्ट झाल्यानंतर. त्या-त्या बाद फेरीअखेर सर्वाधिक मते मिळविण्या-या दोन उमेदवाराव्यतिरिक्त सर्व 24 उमेदवार क्रमाने बाद होत गेले आणि त्यांच्या मतपत्रिकेतील दुसर्‍या पसंतीक्रमाची मते त्या-त्या उमेदवाराकडे वर्ग होत गेली. त्यामुळे सर्वाधिक मते मिळवणा-या व अपेक्षित कोटा पूर्ण करणा-या उमेदवाराला शेवटी विजयी घोषित करण्यात आले. या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्या 7017 मतांमधून 24 व्या बाद फेरीअखेर दुसर्‍या पसंतीची 3002 मते घेवून सरनाईक यांनी विजयासाठी आवश्यक असलेला 16134 मतांचा कोटा पुर्ण करीत 16663 मते घेतली.संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व अधिकारी- कर्मचारी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणा-या पोलीस यंत्रणेचे तसेच प्रसार माध्यम प्रतिनिधींचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी यावेळी जाहीर आभार व्यक्त केले.

Back to top button