दोन आयुर्वेदिक औषधनिर्मिती कंपन्यांचे परवाने रद्द

औषध प्रशासनाची कारवाई; दोन रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस

परतवाड्यातील रक्तसंकलन केंद्राचा परवाना मागे

अमरावती/27 ऑक्टोबर – औषधांच्या गुणवत्तेत तडजोड होऊ नये आणि नियमांचे पालन व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन आढळल्याने जिल्ह्यातील 2 आयुर्वेदिक औषधनिर्मिती कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच अमरावती शहरातील 2 रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून परतवाड्यातील एका रक्तसंकलन केंद्राचा परवानाही मागे घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे औषधनिर्मिती आणि रक्तसंकलन केंद्रांमधील नियमपालनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून औषधनिर्मिती कंपन्या, घाऊक व किरकोळ औषध विक्रेते तसेच रक्तपेढ्यांची नियमित तपासणी केली जाते. मागील आठवड्यात करण्यात आलेल्या तपासणीत नियमभंगाचे प्रकार समोर आल्यानंतर संबंधित संस्थांवर कारवाई करण्यात आली. अमरावती शहरातील एकूण 8 रक्तपेढ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 रक्तपेढ्यांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील 11 रक्तसंकलन केंद्रांपैकी 8 केंद्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये परतवाडा येथील एका रक्तसंकलन केंद्राचा परवाना मागे घेण्यात आला. जिल्ह्यात 4 आधुनिक औषधनिर्मिती कंपन्या, 3 आयुर्वेदिक औषधनिर्मिती कंपन्या आणि 3 सौंदर्यप्रसाधने निर्मिती कंपन्या आहेत. याशिवाय 8 रक्तपेढ्या आणि 11 रक्तसंकलन केंद्रे कार्यरत आहेत. आधुनिक औषधनिर्मिती कंपन्यांची तपासणी पूर्ण झाली असून आयुर्वेदिक औषधनिर्मिती कंपन्यांची तपासणी सुरू आहे. तीन सौंदर्यप्रसाधने निर्मिती कंपन्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2,747 घाऊक आणि 374 किरकोळ औषध विक्रेते आहेत. त्यांच्या आस्थापनांचीही नियमित तपासणी केली जाते. नियमभंग आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाते, अशी माहिती सहायक आयुक्त डॉ. अनिल माणिकराव यांनी दिली.

Back to top button