नांदगाव खंडेश्वरजवळ 165 गॅस सिलिंडरची चोरी

पाच लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

नांदगाव खंडेश्वर/27 ऑक्टोबर  – कंचना गावाजवळील योगिनी गॅस एजन्सीच्या गोदामाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 165 भरलेले गॅस सिलिंडर चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 24 ते 25 ऑक्टोबरदरम्यान घडलेल्या या चोरीत तब्बल 5,22,390 रुपयांचा ऐवज लंपास झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली.
कंचना गावाजवळ योगिनी गॅस एजन्सीचे मोठे गोदाम आहे. या गोदामात घरगुती वापराचे भरलेले आणि रिकामे सिलिंडर ठेवण्यात येतात. गोदामाचे रक्षक प्रतीक सुरेशराव दैवते (वय 28, रा. विठ्ठलनगर, नांदगाव खंडेश्वर) यांनी 24 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 6 वाजता गोदाम नीट बंद केले होते. त्यानंतर 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजता ते गोदामावर पोहोचले असता त्यांना गोदामाचे कुलूप तुटलेले दिसले.
आत जाऊन पाहणी केली असता गोदामातून प्रत्येकी 3,166 रुपये किमतीचे एकूण 165 भरलेले सिलिंडर गायब असल्याचे समोर आले. या प्रकरणी अमित प्र. बकाले, रेश्मा मालपे, स्वप्ना स. घाटोळ, मीना प्र. बकाले, आकाश मालपे, प्रार्थना स. घाटोळ, प्रतीक सुरेशराव दैवते यांच्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. गोदामाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्यांचा माग काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. ठाणेदार आनंद पिदूरकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.

Back to top button