पर्यावरण संरक्षणासाठी विद्यापीठाची मोठी झेप
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाशी शैक्षणिक सामंजस्य करार

अमरावती/26 ऑक्टोबर -संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्यात शैक्षणिक सहकार्य तसेच सामंजस्य करार नुकताच उत्साहात पार पडला.
या महत्त्वपूर्ण सहकार्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन, वन्यजीवांवरील संशोधन आणि पर्यावरणाच्या रक्षणाला मोठी गती मिळणार असून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना थेट जंगलात जाऊन प्रात्यक्षिक संशोधनाची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. जैवविविधता संशोधन आणि निसर्ग संरक्षणासाठी विद्यापीठ सदैव तत्पर राहील, असा ठाम विश्वास प्रभारी कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी व्यक्त केला. या बैठकीस कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. चंद्रशेखरन बाला, विभागीय वनअधिकारी डॉ. मयुरा बैलुमे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. नितीन फिरके, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. बी. नायक, जीवतंत्रशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे, विकास विभागाच्या उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, डॉ. जयंत वडतकर, प्रा. डॉ. के. यू. राऊत, प्रा. डॉ. व्ही. के. नागले आणि प्रा. डॉ. के. सी. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. इ.स. 1973 मध्ये स्थापन झालेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. सातपुड्याच्या मध्य भारतीय भूप्रदेशात पसरलेल्या या अभयारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, गिधाड आणि जागतिक स्तरावर दुर्मिळ मानल्या जाणार्या रानघुबडासारख्या अनेक प्रजातींचा अधिवास आहे. येथील समृद्ध निसर्गाचे जतन करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दीर्घकालीन अभ्यासाची अत्यंत गरज आहे. या करारांतर्गत विद्यापीठातील विविध विभाग आणि अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांना मेळघाटातील विशिष्ट वनपरिक्षेत्रांशी जोडण्यात येईल. वनस्पती व प्राणी सर्वेक्षण, जैवविविधतेची नोंद, कॅमेरा ट्रॅपद्वारे मिळणार्या माहितीचे विश्लेषण, हवामान बदल आणि मानव-वन्यजीव संबंधांचा सखोल अभ्यास यात केला जाईल. सहभागी विभागांना दर सहा महिन्यांनी किमान एक संशोधन अहवाल सादर करावा लागेल. तीन वर्षांच्या प्राथमिक कालावधीसाठी असलेला हा करार संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची बळकट साथ मिळणार आहे.





